शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगाव नगर परिषदेच्या हद्दीतील थकित मालमत्ता कर व घरपट्टीवर आकारण्यात येणारा दोन टक्के दंड व त्यावरील व्याज माफ करावे तसेच नगर परिषदेच्या हद्दीतील ओपन स्पेस एका संस्थेस वाचनालय उभारणीस देण्यात यावी. अशा सर्वानुमते केलेल्या दोन्ही ठरावास जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्थगिती दिल्याचे आदेश शेवगाव नगर परिषदेला आज प्राप्त झाले आहेत.
यासंदर्भात गेल्या १६ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक दोन मध्ये शेवगाव शहरातील मालमत्ता कर व घरपट्टी यांच्या थकीत वसुलीवर दोन टक्के दंड व व्याज आकारणी करण्यात येऊ नये असे मत सर्व नगरसेवकांनी नोंदविले होते. तसेच ठराव क्रमांक तीन नुसार नगर परिषदेच्या हद्दीतील गट क्रमांक ३९१ ही ओपन स्पेस युवा शक्ती प्रतिष्ठानला अभ्यासिका उभारण्यास देण्या बाबत चर्चा होऊन दोन्ही ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले होते.
त्यावर मुख्याधिकार्यांनी सदर ठराव महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार रद्द करण्या बाबत जिल्हाधिकार्यांना विनंती केली होती. यावर गेल्या ८ तारखेला नगरला जिल्हाधिकारी दालनात सुनावणी झाली. या सुनावणीस उपस्थित राहावे म्हणून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षासह नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र यावेळी कमलेश गांधी व अशोक आहूजा हे दोघे नगरसेवक व अॅड . जयप्रकाश देशमुख यांचे शिवाय कोणी उपास्थित राहिले नाही.
यावेळी नगर परिषदेचे करविभाग प्रमुख कोल्हे व जिल्हा प्रशासन अधिकारी लांघे यांनी प्रशासनाची तर गांधी, आहूजा या दोघांनी घर पटटी बाबत बाजू मांडली होती. यावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दोन्ही ठरावास स्थगिती दिली असून सर्व संबधितांना ही समज बजावून दिनांकीत स्वाक्षरी घेऊन त्याचा अहवाल पाठविणे बद्दल नगर परिषदेला कळविण्यात आले आहे .