नगर – नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माघारीसाठी अजून दोन दिवसांचा अवधी आहे. तत्पूर्वी संचालकांच्या 21 पैकी आजअखेर चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात भाजपच्या वाट्याला तीन आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघी एक जागा आली आहे.
पाथर्डी तालुक्यातील सेवा सोसायटी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांच्या व जामखेड तालुक्यातील सेवा सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांच्या विरोधकांनी आज माघार घेतली. त्यामुळे भाजपचे उमेदवार राजळे व राळेभात यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग आज मोकळा झाला. यापूर्वी राहत्यातून विखे पाटील यांचे समर्थक अण्णासाहेब म्हस्के व शेवगावधून राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शुक्रवारी (दि.5) शेतीपूरक व बिगरशेती मतदारसंघातून दाखल केलेले दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतले. 195 पैकी निवडणूक रिंगणात आता 193 अर्ज उरलेले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 फेबुवारीला मतदान होईल. त्यामुळे बिनविरोधसाठीची नेत्यांची धावपळ सुरुच आहे. त्यात माघारीसाठी आता अवघी दोन दिवसांची मुदत उरल्याने नेत्यांमध्ये अस्वस्थता देखील वाढली आहे. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. 12 फेब्रुवारीला निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर चिन्ह वाटप करणार असून, त्यानंतर निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी घोषित होईल.
आम्ही कार्यकर्ते विखेंचेच; पवारांना ‘सपोर्ट’ : राळेभात
आम्ही कार्यकर्ते विखे पाटील यांचेच आहोत. विखे पाटील यांच्याच नेतृत्वाखाली यापुढेही जिल्ह्यात काम करतच राहू. मात्र, जामखेड तालुक्यातील राजकारणापुरता आमचा सपोर्ट यापुढे आमदार रोहित पवार यांनाच असेल, अशी भूमिका बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राळेभात यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. जामखेडमधील राळेभात परिवार विखे पाटील यांचे समर्थक मानले जातात. मात्र, त्यांच्या बिनविरोधसाठी यावेळी आमदार पवार यांनी मोलाची भूमिका बजावली. भोसले यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पवार यांनीच मध्यस्थी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात व तालुक्यातील राजकारणाची राळेभात यांनी अशी विभागणी केली आहे. दरम्यान, विखे व पवारांना एकाच वेळी सोबत घेण्याची राळेभात यांची भूमिका नगर जिल्ह्यात राजकीय चर्चेची ठरली आहे.