जिल्हा बॅंकेची सॅलरी पॅकेज योजना पगारदारांना लाभदायक

सातार  -जिल्ह्यातील पगारदार सेवकांना पगार तारणावर 25 लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीचे धोरण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक प्रभावीपणे राबवत आहे. ही सॅलरी पॅकेज योजना पगारदारांना लाभदायक आहे. या बॅंकेचा नावलौकिक देशभर आहे. बॅंकिग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकीतून जिल्हा बॅंकेने केलेले कार्य आदर्श आहे, असे गौरवोद्‌गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले. 

गौडा यांनी नुकतीच जिल्हा बॅंकेस सदिच्छा भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. विधान परिषदेचे सभापती व बॅंकेचे संचालक रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष सुनील माने, संचालक आ. शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, नितीन पाटील, प्रदीप विधाते, दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, राजेश पाटील-वाठारकर, प्रकाश बडेकर, सौ. कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे व विविध विभागांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

डॉ. सरकाळे म्हणाले, बॅंकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. पगारदार सेवकांसाठी “सातारा जिल्हा बॅंक सॅलरी पॅकेज योजना’ किफायतशीर आहे. कर्जदारास अपघात विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा या योजनांचा लाभ 1364 रुपये वार्षिक हत्यात उपलब्ध करून दिला आहे.

विनाशुल्क डिजिटल बॅंकिंग, बॅंकेच्या एटीएमद्वारे विनाशुल्क, अमर्याद व्यवहार, अन्य बॅंकांच्या एटीएममधून पहिले पाच व्यवहार विनाशुल्क, आंतरशाखीय वर्ग व्यवहार, डिमांड ड्राफ्ट व विनाशुल्क चेकबुक, किफायतशीर व्याजदरात गृह, वाहन व शैक्षणिक कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे. बॅंकेने ग्राहकांसाठी यूपीआयची सुविधा सुरू केल्याने ग्राहकांना भिम, गुगल पे, फोन पे, पेटीएम, फ्रीचार्ज, जिओ मनी या ऍप्सद्वारे खरेदी व्यवहार, फोन व वीज बिले भरणे, मोबाइल रिचार्ज व्हाऊचर, ई-कॉमर्स, रक्कम वर्ग करणे आदी सेवा मिळत आहेत. डिजिटल बॅंकिंग सुविधेमुळे व्यवहाराची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर क्षणार्धात वर्ग होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.