दृष्काळातही जिल्हा बॅंक नफ्यात

बॅंकेला 37 कोटी नफा; 5 हजार 957 कोटी कर्ज येणे

नगर – सलग चौथ्या वर्षीही जिल्ह्याला दुष्काळाने ग्रासले असतांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नफाचा मात्र वाढता आलेखच दिसून आला आहे. दुष्काळामुळे बॅंका, पतसंस्था आर्थिक अडचणीत आल्या असतांना उत्कृष्ट आर्थिक नियोजनामुळे जिल्हा बॅंकेला सन 2018- 19 या आर्थिक वर्षात 37 कोटींचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल दोन कोटी नफ्यात वाढ झाली आहे. अर्थात नफा वाढला पण कर्जाची थकबाकी देखील वाढली आहे. तब्बल 5 हजार 957 कोटी येणे बाकी आहे.

सततचा दुष्काळा, शेतकऱ्यांना करण्यात आलेली कर्जमाफी, त्यामुळे कर्ज वसुलीवर झालेला परिणाम. यावर मात करून जिल्हा बॅंकेने नफाचा वाढता आलेख यंदाही कायम ठेवला आहे. सन 2016-17 मध्ये 33 कोटी 20 लाख 40 हजार रुपये नफा झाला होता. त्या सन 2017-18 मध्ये वाढ झाली. यावर्षी 35 कोटी 76 लाख 85 हजार रुपये नफा झाला. सलग तीन वर्ष दुष्काळाचा जिल्हा सामना करीत असतांना बॅंकेच्या नफात वाढ झाल्याबद्दल आर्श्‍चय व्यक्‍त होत आहे. अर्थात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पिक कर्जातून बॅंकेला फायदा होत नाही. परंतु पगारदार संस्थासह सहकारी साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या कर्जामुळे बॅंकेच्या नफ्यात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आले. मात्र कारखान्यांनी गळीत हंगात झाल्यानंतर लगेच साखर विक्री केल्याने आलेला पैसा तातडीने बॅंकेला जमा केला होतो. त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या व्याजाची रक्‍कम कमी झाली होती. पण यंदा कारखान्यांनी अद्यापही साखरेची विक्री केली नाही. परिणामी व्याज वाढले असून त्यातून बॅंकेला नफा झाला आहे. आशिया खंडात जिल्हा बॅंकेचा नावनौलिक आहे. राज्यात बोटावर मोजता येतील, अशा काही बॅंकांची आर्थिक स्थिती भक्‍कम आहे. त्यात नगर जिल्हा बॅंकेचा क्रमांक लागतो.

दुष्काळाबरोबर राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी केलेली कर्जमाफीमुळे अजूनही शेतकरी सरसकट कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत आहे. परिणामी शेतकरी कर्ज फेड करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेची थकबाकी वाढली आहे. सध्या 5 हजार 957 कोटी थकबाकी झाली आहे. ती गेल्या वर्षीच्या तब्बल 10 हजार कोटीने वाढली आहे. बॅंकेच्या ठेवीमध्ये देखील वाढ झाली आहे. 6 हजार 902 कोटी ठेवी असून गेल्या वर्षी त्या 6 हजार 222 कोटी होत्या. भाग भांडवल 237 कोटीवर गेले आहे. तसेच गुंतवणूक देखील 2 हजार 739 कोटींवर झाली आहे.

बॅंकेला असलेल्या परंपरेनुसार आजही बॅंकेचे कामकाज सुरू आहे. काटकसरीत बॅंकेचा कारभार करण्यात येतो. पिककर्जातून बॅंकेला फारसा नफा होत नाही. परंतु पगारदार संस्थांसह साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जामुळे बॅंकेच्या नफ्यात वाढ होत आहे. पगारदार संस्थांना 300 कोटींपर्यंत पतपुरवठा केला जातो.

रावसाहेब वर्पे , कार्यकारी संचालक

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.