नगर – नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची प्ररुप मतदार यादी आज शुक्रवारी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागिय सहनिबंधक डॉ. ज्योती लाठकर यांच्या सहीनिशी प्रसिद्ध केली. जिल्हा बॅंकेच्या शेतीपूरक तसेच शेती माल प्रक्रिया पणन संस्थेचे 906, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी 1389 व बिगर शेती संस्था 1556 असे एकूण तीन हजार 851 मतदारांची प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली.
शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र या निर्णयाला उच्च न्यायालयात हरकत घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश पारित केले. या आदेशानंतर आज शुक्रवारी जिल्हा सहकारी बॅंकेची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये शेतीपूरक तसेच शेती माल प्रक्रिया व पणन संस्था मतदार संघातून ठराव प्राप्त 832 व ठराव अप्रा पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ठराव प्राप्त 1371 व ठराव अप्राप्त 18 असे एकूण 1389, बिगर शेती संस्था मतदारसंघात ठराव प्राप्त 1316, ठराव अप्राप्त 180 व व्यक्ती सभासद 60 असे एकूण 1556 मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीवर आक्षेप घेण्याची मुदत 16 मार्च पर्यंत आहे.
मतदार यादीवर आक्षेपांवर निर्णय घेण्यासाठी 26 मार्च अंतिम दिनांक असून अंतिम मतदार यादी 30 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.यानंतर जिल्हा बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून रणधुमाळी सुरु होणार आहे. आपल्या मर्जीतील जास्तीत जास्त मतदार सभासद होण्यासाठी जिल्हभरातून जोरदार प्रयत्न झालेले आहेत. त्यामुळे अनेक मतदारांवर आक्षेप येवू शकतात.