नगर (प्रतिनिधी) – जिल्हा बँक निवडणूक अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या, तर 4 जागांसाठी निवडणूक लागली आहे. सेवा सोसायटीच्या नगर, कर्जत, पारनेर मतदारसंघातून, तर बिगरशेती मतदारसंघात निवडणूक होणार आहे.
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. गुरुवार (दि.11) रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 21 जागांपैकी ऐकूण 17 जागा बिनविरोध झाल्या.
यात सेवा सोसायटी मतदारसंघातील 11, महिला प्रतिनिधींच्या 2 आणि शेतीपूरक प्रक्रिया, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग अनुसूचित जाती-जमाती प्रत्येकी एक जागांचा समावेश आहे. उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होणार आहे आहे. यामध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले, अंबादास पिसाळ, उदय शेळके, दत्तात्रय पानसरे व ीमनाक्षी साळुंके पाच विद्यमान संचालकांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीची रणनीती आखत नगरमध्ये तळ ठोकून होते. बुधवारपर्यंत तीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. राहाता सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, शेवगावमधून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर समोरील उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने पाथर्डीतून आ. मोनिका राजळे, कोपरगावमधून विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच जामखेडमधून राळेभात पिता-पुत्रांपैकी एकाची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
बुधवारपर्यंत 21 जागांपैकी पाच जागा बिन विरोध झाल्या होत्या. गुरुवारी (दि.11) रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात नेते, कार्यकर्ते यांची मोठी गर्दी झाली होती. मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकाच दिवसात तब्बल 12 जागा बिनविरोध निवडल्याचे स्पष्ट झाले. यात आठ जागा सेवा सोसायटी मतदारसंघातील आहेत. दरम्यान, जामखेड सेवा सोसायटी मतदारसंघातून ज्येष्ठ नेते व विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र अमोल राळेभात जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडले गेले आहेत.
सेवा सोसायटी मतदारसंघ
अकोले- सीताराम गायकर, जामखेड- अमोल राळेभात, कोपरगाव- विवेक कोल्हे, नेवासे- मंत्री शंकरराव गडाख, पाथर्डी- आमदार मोनिका राजळे, राहाता- अण्णासाहेब म्हस्के, राहुरी- अरुण तनपुरे, संगमनेर- माधवराव कानवडे, शेवगाव- चंद्रशेखर घुले, श्रीगोंदा- राहुल जगताप, श्रीरामपूर- भानुदास मुरकुटे.
अनुसूचित जाती मतदारसंघ
अमित भांगरे,
इतर मागासवर्ग
करण जयंत ससाणे
विमुक्त जाती भटक्या जमातीमधे
गणपतराव सांगळे
शेतीपूरक प्रक्रिया
आमदार अशुतोष काळे
महिला प्रतिनिधी मतदारसंघ
अनुराधा नागवडे, आशा तापकीर या17 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.