लोकशाहीच्या उत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

आज मतदान; बावीस हजार कर्मचारी नियुक्‍त, जिल्ह्यात एकूण 25 लाख मतदार

सातारा  – सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या, दि. 21 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात एकूण 2978 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्‍त करण्यात आलेले तब्बल 22 हजार कर्मचारी छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलातून मतदान साहित्य घेऊन आपापल्या नियुक्‍तीच्या ठिकाणी रविवारी रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली. मतदान झाल्यानंतर गुरुवार, दि. 24 रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार असून त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत 18 लाख 60 हजार तर आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये 25 लाख 34 मतदार आहेत. 18 ते 19 वर्षे वयोगटात 78 हजार मतदार असून दुबार मतदार नोंदणी अभियानामुळे अवघ्या तीनच महिन्यांत तब्बल पस्तीस हजार मतदार वाढल्याचे मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणानंतर स्पष्ट झाले. मतदान केंद्रे संबंधित इमारतींच्या तळमजल्यावर तयार करण्यात आली असून दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सोय करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. सातारा-जावळी व कराड उत्तर मतदारसंघात नऊ ठिकाणी पावसामुळे इमारती धोकादायक झाल्याने तेथील मतदान केंद्रे इतरत्र हलविण्यात आली असून त्यांची माहिती संबंधित मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

लोकसभा व आठ विधानसभा मतदारसंघांमधून 73 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सातारा जिल्ह्यातील 12,700 जवान लष्करी सेवेत असून त्यांचे पोस्टल मतदान होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात 251 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून तेथे जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल 22 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्‍त करण्यात आले असून त्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन व इतर साहित्याचे वाटप जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर उभारलेल्या नियंत्रण कक्षातून करण्यात आले. जवळपास सर्व मतदान केंद्रांवरील कर्मचारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपापल्या नियुक्‍तीच्या ठिकाणी रवाना झाल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी आर. एस. शिंदे यांनी दिली.

दरम्यान, रविवारी आलेल्या पावसामुळे मतदान प्रक्रियेतील कर्मचारी व शिक्षकांची तारांबळ उडाली. नियंत्रण कक्ष असलेल्या मांडवात प्रचंड पाणी येत असल्याने बंदिस्त दालनात आढावा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रिया एमआयडीसीतील एमडीओ गोडाऊनमध्ये दि. 24 रोजी होणार आहे. त्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. पहिल्या स्तरात राज्य राखीव पोलीस दल, दुसऱ्या स्तरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि तिसऱ्या स्तरात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.