नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक प्रांगणात नारी शक्ती पुरस्कार वितरीत करण्यात आले.
यामध्ये गवंडी महिला, झारखंडमधील टारझन प्रमाणे जंगलात राहणारी महिला आणि मशरुम महिला यासारख्या 15 महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
2019 साठीच्या “नारी सन्मान’ शेती, क्रीडा, हस्तकला, वनीकरण आणि वन्यजीव संरक्षण, सशस्त्र सेना आणि शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील महिलांना निवडण्यात आले आहे.
“मशरुम महिला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीना देवी यांनी 105 गावांमध्ये मशरुमच्या लागवडीला लोकप्रियता प्राप्त करून दिली.
तर “चंदिगड की मिरॅकल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या 103 वर्षीय मन कौर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी ऍथलेटिक खेळायला सुरुवात केली.
त्यांनी पोलंडच्या वर्ल्ड मास्टर्स ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्णपदके जिंकली आणि 2018 च्या अमेरिकन मास्टर्स क्रीडा स्पर्धेत विक्रम प्रस्थापित केला. ऑकलंड स्काय टॉवर चढून जाणाऱ्या सर्वात वयोवृद्ध महिलेचा मानही त्यांनी मिळवला.
कलावती देवी यांनी कानपूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वतःच गवंडीकाम करायला सुरुवात केले. त्यांच्या प्रेरणेतून 4 हजार शौचालये उभारली गेली. तर पडला भुदेवी या “चिनाई आदिवासी विकास सोसायटी’ या संघटनेच्या माध्यमातून आदिवासी महिला, विधवा, पडीक भूमीच्या विकासासाठी कार्यरत आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठेचे राष्ट्रीय पुरस्कार महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाद्वारे दरवर्षी दिले जातात.
8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हे पुष्कर प्रदान केले जातात. या समारंभात, पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आधी स्वच्छ भारत- भारताच्या स्वच्छतेची कथा या विषयावरील विशेष लघुचित्रपट दाखवण्यात आला होता.
या लघुचित्रपटात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामीण भागात लोकांच्या मानसिकतेत झालेला बदल आणि देशात 55 वर्षांपासून सुरु असलेली उघड्यावर शौचाची कुप्रथा समूळ नष्ट करण्यात ग्रामीण महिलांनी घेतलेला पुढाकार याचे चित्रण करण्यात आले आहे.