३ लाख २२ हजार ५०० रुपयांच्या धनादेशाचे वाटप
राजगुरूनगर – खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 63 गरिब व हेतकरू विद्यार्थ्यांना विविध संस्थांच्या शिष्यवृत्तीचे एकूण 3 लाख 22 हजार 500 रुपयांच्या धनादेशाचे नुकतेच वाटप करण्यात आले.
लोकनेते शरद पवार यांच्या पवार चॅरीटेबल ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे स्मरणार्थ “सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती’, लोकनेते शरदरावजी पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या स्मरणार्थ “शारदाबाई पवार शिष्यवृत्ती’, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. साहेबरावजी बुट्टे पाटील यांच्या स्मरणार्थ “साहेबराव बुट्टे पाटील शिष्यवृत्ती’ व आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावडिलांच्या स्मरणार्थ “दत्तात्रेय वळसे पाटील शिष्यवृत्ती’ वाटपाचा कार्यक्रम नुकताच खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभागृहांमध्ये पार पडला.
याप्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, गणेश जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, साहेबराव बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शिल्पा जगताप, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. एन. टाकळकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्रबंधक के. आर. पाचारणे, विभाग प्रमुख बापूसाहेब चौधरी, अशोक थिगळे यांच्यासह प्राध्यापक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.
शरदरावजी पवार यांनी या संस्थेला भेट दिली त्यावेळी संस्थेत शिकणारे विद्यार्थी हे गरीब आणि शेतकरी कुटुंबातले असल्याने त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी व त्यातून प्रेरणा घेऊन गरीब होतकरू विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळण्यासाठी ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी या शिष्यवृत्तीचा उपयोग केला जात आहे.
-ऍड. देवेंद्र बुट्टे पाटील, अध्यक्ष,खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ