रशियाच्या स्पुटनिक 5 लसीचे वितरण डॉ. रेड्डी लॅबोरेटरीकडे

नवी दिल्ली – कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी रशियाच्या ‘स्पुटनिक 5’ या लसीच्या मानवी चाचण्या आणि वितरण करण्याची जबाबदारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीकडे सोपवण्यात आली आहे. ‘रशियन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट फंड’ने ही माहिती दिली आहे. लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व किमान अपेक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी ‘आरडीआयएफ’च्यावतीने भारतीय नियामकांबरोबर चर्चा सुरू आहे. 

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड ही भारतात मुख्यालय असलेली जागतिक दर्जाची औषध कंपनी असून ‘आरडीआयएफ’ च्या स्पुटनिक-5 लसीचे 100 दशलक्ष डोस पुरवण्यास आणि या लसीच्या वैद्यकीय चाचण्या करण्यास तसेच भारतातील लसीचे सार्वजनिक वितरण करण्यास या कंपनीने तयारी दर्शवली आहे, असे ‘आरडीआयएफ’चे मुख्य कार्यकारी अधिकाई किरिल दिमित्रेव यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. 

करोना विषाणूविरोधातील स्पुटनिक-5 ही लस “गामालेया नॅशनल रिसर्च सेंटा ऑफ एपिडेमिओलॉजी’ आणि ‘आरडीआयएफ’ने संयुक्‍तपणे विकसित केली आहे. या लसीच्या आणखी काही वैद्यकीय चाचण्या ब्राझिल, भारत, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्‍त अरब अमिराती आणि बेलारुस सारख्या अनेक देशांमध्ये घेतल्या जाणार आहेत, असे दिमित्रेव यांनी सांगितले.

करोनाविरोधातील लसीच्या संदर्भात भारतीय अधिकाऱ्यांबरोबर आपली चर्चा सुरू असल्याचे रशियाच्यावतीने या महिन्याच्या प्रारंभी जाहीर केले गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.