पिंपरी – करोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने अर्थसहाय्य दिले जाते. विभागाकडे अर्ज प्राप्त झालेल्या अशा 554 महिलांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाविकास विभागाच्या वतीने विधवा महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. तर करोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. हे सहाय्य एकदाच दिले जाते.
2021-22 या वर्षात 3 हजार 299 विधवा महिलांना 3 कोटी 29 लाख 90 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे. तर करोनामुळे पतीचे निधन झालेल्या 554 महिलांना 1 कोटी 29 लाख 60 हजार रुपयांचे अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
प्रशिक्षणांचा हातभार
करोनामुळे पतीचे निधन झाल्याने अनेक कुटुंबाचा आधारस्तंभ गेला. त्यामुळे महिलांना घर चालविणे कठीण जात होते. अनेकांकडे रोजगाराचे साधनही नव्हते. अशा महिलांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि कुटुंबालाही हातभार लावावा व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे काही प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली आहेत. त्यात हर्बल, टेलरिंग, ब्युटी पार्लर आदी प्रशिक्षणांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाच्या 3 बॅंच आत्तापर्यंत पूर्ण झाल्या असून त्यातून सुमारे 160 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.