महापालिकेच्या 73 कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती
नगर – महापालिकेत 12 व 24 वर्ष सेवा केलेल्या 73 कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार पदोन्नती देण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिकेत आयोजित कार्यक्रमात महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपमहापौर मालणताई ढोणे, उपायुक्त सुनिल पवार, डॉ.प्रदीप पठारे, महिला व बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ, अस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे आदी उपस्थित होते.
वाकळे म्हणाले, महापालिकेच्या वतीने नगरकरांना दिल्या जाणाऱ्या मुलभूत नागरी सुविधा योग्य रीतीने नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर असते. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्याचा आणि नगर शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्याचा संकल्प केला ही बाब कौतुकास्पद असून या संकल्प पुर्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
भालसिंग म्हणाले, शहरातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका प्रशासन नेहमीच कार्यरत असते, ज्या कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा केली. त्यांना 12 वर्षानंतर आणि 24 वर्षानंतर कालबद्ध पदोन्नती देणे हे शासकीय नियमानुसार बंधनकारक आहे.