डॉक्टर व पोलिसांना मराठी एनसीएलकडून पीपीई किटचे वाटप

टाकळी ढोकेश्वर  (वार्ताहर) – पुण्यातील सीएसआयआर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मराठी एनसीएल या संशोधक विद्यार्थ्यांच्या गटाने 100 फेसशील्ड, 300 हॅंड ग्लोज व चार पीपीई किट पारनेर येथील डॉक्टर व पोलिसांकडे सुपूर्द केल्या.

यासाठी लागणारा निधी मराठी एनसीएलने सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे काम करणारे शास्त्रज्ञ, संशोधक विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि इतर कर्मचारी यांच्याकडून गोळा केला. करोना सारख्या कठीण काळात शहरातील पोलीस आणि रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. त्याप्रमाणेच ग्रामीण भागातही पोलीस दल या करोनाच्या संकटाला धैर्याने सामोरे जात आहेत.

शहराप्रमाणेच ग्रामीण पोलिसांनाही कुणीतरी त्यांच्यासोबत उभे असल्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी मराठी एनसीएलकडून फेसशिल्ड, पीपीई किट व ग्लोज पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. या आधीही मराठी एनसीएलतर्फे महाराष्ट्र राज्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची आर्थिक मदत, पुणे शहरातील पोलीस आणि रुग्णालयांना 200 पीपीई किटची मदत करण्यात आली आहे.

सध्या आरोग्य कर्मचारी आणि पोलीस खाते आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मराठी एनसीएलचा हा एक छोटा प्रयत्न असल्याची भावना देशातील व परदेशातील शास्त्रज्ञ व संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.