पिंपरी – राज्यामध्ये “करोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास तसेच प्रवास करण्यावर बंदी आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे. मात्र तरीही पीएमपीएमएल मधून नागरिक प्रवास करतात. त्यामधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनीच प्रवास करणे अपेक्षित आहे.
फक्त त्याच कर्मचाऱ्यांनी प्रवास करावा यासाठी त्यांना पासचे वितरण करण्यात येणार आहे. सध्या दोन्ही मनपा रुग्णालय, खासगी रुग्णालय, पोलीस, सुरक्षा, पाणीपुरवठा, विद्युत, सफाई आदी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता काही मार्गावर बससेवा चालू आहे. तसेच सर्व पास केंद्र बंद आहेत
दररोज रोख पैसे देऊन तिकीट घेण्यामध्ये संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे पास केंद्रवरील मासिक पास वितरण चालू करण्याची अनेक कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे. या मागणीचा विचार करून बुधवार (दि. 1 ते 7 एप्रिल)पासून सात दिवस पुणे महापालिका आणि पिंपरी (मुख्यालय क्र 2) येथील पास केंद्र सकाळी 7 ते 2 या वेळात चालू ठेवण्यात येणार आहेत. ओळखपत्र पाहून पास केंद्रावर फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना मनपा सेवक पास आणि इतर पास वितरण करण्यात येणार आहे.