रोहित, ईशांतसह अनेकांची अनुपस्थिती : राष्ट्रीय क्रीडादिनी पुरस्काराच्या रकमेतही वाढ
नवी दिल्ली – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचा दिवस राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी याच 29 ऑगस्टच्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र, फरक इतकाच की करोनाचा धोका कायम असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोशल मीडियाप्रमाणेच आभासी सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात आले.
खेलरत्न पुरस्कार विजेता क्रिकेटपटू रोहित शर्मा, अर्जुन पुरस्कारप्राप्त ईशांत शर्मा आयपीएल स्पर्धेसाठी अमिरातीत असल्याने तसेच करोनाच्या धोक्यामुळे या दोघांसह एकूण 14 खेळाडू या सोहळ्यात हजेरी लावू शकले नाहीत. कुस्तीपटू विनेश फोगटही करोनाबाधित झाल्याने या सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) निश्चित केलेल्या अकरा ठिकाणांवरून विजेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते राष्ट्रपती भवनातून आभासी पद्धतीने दिले गेलेले पुरस्कार स्वीकारले. यंदा प्रथमच खेळाडूंना राष्ट्रपती भवनात हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहता आले नाही. देशातील करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने हा सोहळा आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी यंदा 74 खेळाडू आणि प्रशिक्षकांची निवड करण्यात आली होती, त्यात 14 जण गैरहजर होते.
महिला हॉकीपटू राणी रामपाल आणि पॅरा-ऍथलिट मरियप्पन थांगवेलू बेंगळुरूहून आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा पुण्याहून या सोहळ्यात सामील झाली. रोहित व ईशांतसह जे खेळाडू सध्या परदेशात आहेत त्यांना नंतर पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच पुरस्कार विजेत्यांपैकी तिघांना करोनाची बाधा झाल्याने ते देखील या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.
पुरस्कार रकमेत मोठी वाढ…
यंदापासून खेलरत्न व अर्जुन या मानाच्या पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडामंत्री रिजीजू यांनी जाहीर केला होता. तो शब्द पाळत यंदा खेलरत्न विजेत्याला 25 तर अर्जुन पुरस्कार विजेत्याला 15 लाख रुपये देण्यात आले. त्यापूर्वी आज मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रिजीजू यांनी देशातील क्रीडापटूंच्या वतीने अभिवादन केले.