वाघोली : केशरी रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात शासनाकडून धान्य वाटप केले जात आहे. वाघोली येथील केशरी रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांना १ एप्रिलपासून सातव हायस्कूलमध्ये गहू आणि तांदूळ वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. ज्या रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानदारांनी अगोदर पावती (टोकन) दिले आहे.
त्यांनाच कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीप्रमाणे ३ किलो गहू ८ रुपये दराने व २ किलो तांदूळ १२ रुपये दराने देण्यात येत आहे. धान्य वाटपाबाबत तक्रारींवर, नियंत्रण ठेवण्यासाठी चार शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत चार हजार नागरिकांना धान्याचे वाटप झाल्याची माहिती माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी दिली .