सातारा – सातारा शहरात विविध संस्था, संघटनांनी सामाजिक जागृतीचे भान राखत दिपावलीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविले. सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील दिल दोस्ती ग्रुपच्यावतीने गरीब व गरजू लोकांना दिवाळी फराळाचे वाटप करुन वेगळा संदेश देण्यात आला.
फटाक्यांची आतषबाजी, फराळाची लगबग, कपड्यांची खरेदी अशा थाटात सदन कुटुंबांमध्ये दिवाळी साजरी होत असली तरी अनेक गरजू, गरीब कुंटुंबे मात्र हे सण साजरा करण्यापासून वंचित राहतात. या व्यक्तींनाही दिवाळी थाटात साजरी करण्याचा अधिकार असून त्यांना तो मिळवून देण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गरीब, गरजू व्यक्तींची दिवाळी गोड होताना दिसत आहे.
दिल दोस्ती ग्रुपमार्फत सुमारे ३०० हून अधिक गरीब गरजूंना राजवाडा, गोल बाग, राजपथ, पोवईनाका, एसटी स्टँड परिसर, शिवराज पेट्रोल पंप परिसर, गोडोली नाका व अन्य ठिकाणी दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, प्रशांत सातपुते, रविंद्र कुलकर्णी, विजय पवार, कुमार मोने, जितेंद्र डोईफोडे, तुषार निकम, सुनील खामकर, मनोज पवार, योगेश राजगुरू यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.