वडूज (प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वडूज नगरपंचायतीच्यावतीने नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी “अर्सेनिकम अल्बम 30′ या गोळ्यांचे तसेच कापडी पिशच्यांचे वाटप केले.
नगरपंचायतीच्यावतीने घरोघरी अर्सेनिकम अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. सुमारे सात हजार औषध बाटल्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती नगरपंचायतीच्यावतीने देण्यात आली. तसेच नगरपंचायतीने प्लॅस्टिक मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्या संदर्भात प्रत्येक कुटुंबाकरिता एक कापडी पिशवी वाटप करण्यात येत आहे, अशा एकूण सात हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासोबतच करोना व डेंग्यू जनजागृतीचे माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.
सर्व नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्ष सौ. किशोरीताई पाटील व सर्व नगरसेवक यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, विरोधी पक्ष नेते शहाजीराजे गोडसे, नगरसेवक अनिल माळी, प्रदीप खुडे, स्वीकृत नगरसेवक संदीप गोडसे, सचिनसेठ माळी, राजेंद्र चव्हाण, राजू कुंभार, संजय काळे, सोमनाथ जाधव, डॉ. प्रशांत गोडसे उपस्थित होते.