वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – आमदार सुनिल शेळके यांनी सुरू केलेल्या आदिम सेवा अभियानाअंतर्गत आणि मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव – कातवी शहरातील ठाकर समाजातील १० कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज देखील भरून घेण्यात आले.
वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांना त्यांच्या जातीचे दाखल्यांचे वाटप करण्यात आले. कित्येक वर्षे प्रयत्न करूनही न मिळालेले जातीचे दाखले मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाल्याने आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला.
तसेच, यापुढे ठाकर समाजातील आणखीन काही वंचित कुटुंबीयांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी सांगितले.
जातीचे दाखले नसल्याने आदिवासी बांधवांना पात्रता असूनही कागदपत्रांच्या अभावी सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागत होते. तसेच विविध शासकीय कामे, मुलांची शैक्षणिक कामे अशा दाखल्यांमुळे अडून राहत होती.
पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असल्याने जातीचे दाखले काढण्यासाठी आदिवासींना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा नागरिकांसाठी आमदार सुनिल शेळके यांनी विशेष अभियान सुरू केले आहे. याप्रकरणी सचिन वामन, रुपेश सोनुने, यशवंत शिंदे यांचे सहकार्य मिळाले.