मुख्यमंत्र्यांसह चार मंत्र्यांना बंगल्याचे वाटप

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह चार मंत्र्यांना सरकारी निवासस्थानांचे वाटप केले. ठाकरे यांचा मुक्काम मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहिल. तर छगन भुजबळांचे वास्तव्य ‘रामटेक’वर असेल.

मंत्रालयातील पसंतीच्या दालनावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच असताना सामान्य प्रशासन विभागाने आज तीन मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप केले.

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानानंतर ‘रामटेक’ हा बंगला महत्त्वाचा मानला जातो. मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्र्याचा मुक्काम शक्‍यतो ‘रामटेक’वर असतो. 1995 मध्ये युती सरकारच्या कार्यकाळात ‘रामटेक’ बंगला तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना मिळाला होता. त्यानंतर 1999 ते 2014 अशी सलग 15 वर्ष ‘रामटेक’ बंगला भुजबळांच्या ताब्यात होता. 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे ‘रामटेक’वर गेले होते.

यापार्श्वभूमीवर ‘रामटेक’ बंगला पुन्हा एकदा भुजबळांच्या वाट्याला आला आहे. उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून भुजबळ तब्बल 15 वर्ष आपल्या कुटुंबासह ‘रामटेक’वर राहत होते.
राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री जयंत पाटील यांना मलबारहिल येथील ‘सेवासदन’ तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना ‘रॉंयलस्टोन’ निवासस्थान मिळाले आहे. विधानसभा तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंत मंत्रालयासमोरील बंगला देण्यात आला आहे.

मधुकरराव पिचड, नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे-पाटील, विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, विनोद तावडे, धनंजय मुंडे आदींना विरोधी पक्षनेते असताना मंत्रालयासमोरचा बंगला मिळाला होता. मात्र, नवनियुक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबारहिल येथील ‘सागर’ बंगला मिळाला आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, डॉं. नितीन राऊत या मंत्र्यांना अद्याप बंगल्याचे वाटप झालेले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)