– वंदना बर्वे
लातूर – महाराष्ट्रातील खासदार अजूनही घराच्या शोधात गुंतले असतानाच लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी आपल्या मतदारसंघातील नऊ हजार अपंगाना जवळपास साडे सात कोटीचे साहित्य मिळवून दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सामाजिक न्याय मंत्रालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कृत्रीम अवयव निर्माण महामंडळाच्या माध्यमातून लातूर लोकसभा मतदारंसघातील 8797 अपंगांना सात कोटी 65 लाख रुपयांच्या विविध प्रकारच्या कृत्रीम अंगांचा पुरवठा करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2019 ते सात जानेवारी 2020 पर्यंत या आठ दिवसांच्या कालावधीत पात्र उमेदवारांची ओळख पटविण्यात आली. यात अंदाजे 12 हजार लोकांपैकी नऊ हजार अपंग पात्र आढळून आले.
महत्वाचा मुद्या असा की, 2019च्या मे महिन्यात 17 व्या लोकसभेची निवडणूक झाली होती. यास दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. यातील जवळपास एका वर्षाचा कालावधी करोना महामारीचा बळी पडला. यामुळे महाराष्ट्रातील अनेक खासदारांना अजूनही घर मिळालेले नाही.
अशात, लातूर लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार अपंगाना कृत्रीम अंग पुरविण्यात भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांना यश आले आहे. श्रृंगाने यांनी 2019 च्या ऑगस्ट महिन्यात सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पहिले पत्र लिहिले. मंत्रालयाने असिस्टंस टू डिसएबल एड्स अप्लांयसेस (एडीआयपी) या योजनेंतर्गत कृत्रीम साहित्याचा पुरवठा करावा, अशी मागणी केली होती.
सामाजिक मंत्रालयाने हे पत्र भारतीय कृत्रीम अंग निर्माण महामंडळाला पाठवून मतदारसंघातील पात्र उमेदवारांचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले. 10 डिसेंबर रोजी ऑनलाईन कार्यक्रम घेवून कृत्रीम अंगांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत आणि धनंजय मुंडे उपस्थित होते.