पुणे – “गणपती बाप्पा मोरया…’ असा नादघोष करत मंगळवारी सकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी “सिरम इन्स्टिट्यूटच्या आवारातून लसीचा पहिला कंटेनर निघाला. सकाळी तो राज्याबाहेर विमानाने पाठवला गेला. तसेच महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाच्या मध्यवर्ती लस भांडारात सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमाराला 9 लाख 63 हजार लस असलेला कंटेनर आला. हे सगळे दिवसभराचे वातावरण आरोग्य विभागासाठी चैतन्यमयी ठरले.
“सीरम इन्स्टिट्यूट’च्या आवारात पहाटे परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते लसीच्या कंटेनरला हार घालून आणि नारळ फोडून विमानतळाच्या दिशेने रवाना करण्यात आले. विमानतळावरही उत्साहाचे वातावरण होते.
त्यानंतर महाराष्ट्र राज्यासाठीचा 9 लाख 63 हजार लस असलेला कंटेनर सायंकाळी पावणेसहाच्या सुमाराला ताडीवाला रस्त्यावरील “नॅशनल कोल्ड चेन रिसोर्सेस सेंटर’च्या आवारात आला. त्यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक आणि राज्याचे लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील आदींनी त्याची पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांना लसीच्या कंटेनरसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे जवळपास सर्व कर्मचाऱ्यांनी कंटेनरच्या पुढे उभे राहून फोटोसेशन केले. या लसीचे बॉक्स दुसऱ्या कंटेनरमध्ये घालून त्याचे वितरण करण्यासाठी आरोग्य विभागाने त्यांचे कंटेनर सज्ज केले. मंगळवारी रात्रीपर्यंत लस नियोजित स्थळी पोहोचवली जाणार आहे. 16 तारखेला लसीकरणाच्या शुभारंभदिनी ती सगळीकडे पोहोचली असेल, असा विश्वास डॉ. अर्चना पाटील यांनी व्यक्त केला.