मूर्तीदात्यांना अडीच हजार किलो खत वाटप

पुणे – महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवांतर्गत यंदापासून मूर्तीदान ही संकल्पना राबविण्यात आली. या अंतर्गत विसर्जन घाटांवर भाविकांना विनंती करून मूर्तीदान करण्याचे आवाहन केले. तसेच ज्या भाविकांनी मूर्तीदान केली, त्यांना मोफत 2 किलो खत वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत 2 हजार 440 किलो खताचे वाटप करत 1,100 हून अधिक मूर्तींचे संकलन केले.

“भूमीग्रीन’ संस्थेच्या पुढाकाराने घनकचरा व्यवस्थापन विभागाने हा उपक्रम राबवला. तर, उपक्रमास मिळालेली पसंती लक्षात घेऊन पुढीलवर्षी तो अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वृद्धेश्‍व घाट, शिवाजीनगर, पटवर्धन समाधी घाट, कात्रज रॅम्प व येरवडा लुंबिनी उद्यान येथे हा उपक्रम राबविण्यात आला. वृद्धेश्‍वर व पटवर्धन घाट येथे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्‍त ज्ञानेश्‍वर मोळक, “भूमीग्रीन’चे संचालक पंकज पासलकर, विजय टिळेकर यांच्या हस्ते खत वाटप करण्यात आले. यावेळी ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे माजी उपायुक्त अनिल पवार यांनीही आवाहनाला प्रतिसाद आपली गणेशमूर्ती दान केली. तर येरवडा येथे लुंबिनी उद्यानात उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मूर्ती स्वीकारल्या व नागरिकांना खत दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.