पुणे – राज्यातील खासगी प्राथमिक अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनांसाठी 8 कोटी 1 लाख 34 हजार रुपये वितरित करण्यात आले आहे. ज्या उद्देशासाठी हे अनुदान देण्यात आले आहे त्यासाठीचे ते खर्च करावे लागणार आहे.
शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वेतन व भत्ते अदा करण्यात येतात. सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 53 कोटी 42 लाख 32 हजार एवढी तरतूद मंजूर झालेली आहे. टप्प्याटप्प्याने हे अनुदान शाळांना देण्यात येत आहे. 5 कोटी 34 लाख 23 हजार रुपये इतकी तरतूद संगणक प्रणालीवर वितरणासाठी उपलब्ध झालेली आहे.
निधीच्या खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करावा लागणार आहे. वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे लागणार आहे. विविध शासकीय, प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहायक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वीच्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत.
पूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे लेखाधिकारी ज्ञानेश्वर पारधी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांना दिले आहे.