पिंपरी, (प्रतिनिधी) – ई पॉस मशीन सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने गरजू नागरिकांना रेशन दुकानावरून धान्य वेळेत मिळत नाही. याचा फटका रेशनकार्ड धारकांना बसत आहे हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण त्वरित दूर करून गरजुंना धान्य वाटप करावे; अन्यथा छावा स्टाईलने आंदोलनाचा इशारा छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात दिला आहे.
रेशन दुकानदाराकडून रेशनकार्ड धारकांना धान्य वितरित केल्यानंतर ई पॉस मशीन प्रणाली द्वारा निघणारी पावती दिली जात नाही. मागणी करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. बर्याच दुकानातून भावफलक, उपलब्ध धान्यसाठा या माहितीचे फलकच गायब झाले आहेत. ही गंभीर बाब आहे.
त्यामुळे हे सर्व चुकीचे प्रकार त्वरित थांबवून गरीब जनतेला न्याय द्या अन्यथा छावा स्टाईल ने आंदोलन करुन जनतेला न्याय देवू.तर ऑफलाईन धान्य वाटप न करता ई पॉस मशीनद्वारेच धान्य वितरित करण्यात यावे. तसेच या महिन्यात येणारा आनंदाचा शिधा सुद्धा ई पॉस प्रणालीद्वारा वितरीत व्हावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
छावाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी अन्न आणि पुरवठा विभागाचे उप आयुक्त दिनेश तावरे यांची भेट घेऊनहे निवेदन दिले यावेळी छावाचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा निलम सांडभोर,शहराध्यक्ष निशा जाधव उपस्थित होते.