करोना, लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प
फिटनेस क्लब असोसिएशनची शासनाकडे धाव
पुणे – ऑगस्टपासून जिम सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्याबाबत सरकारपातळीवर चर्चा होत आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने हे व्यावसायिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन या व्यवसायाला मदत करावी, अशी मागणी पुणे फिटनेस क्लब अससोसिएशनने केली आहे.
लॉकडाऊनमध्ये जिम आणि फिटनेस क्लब व्यवसायदेखील बंद होता. त्यानंतर जून महिन्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. मात्र, तरीही या व्यवसायाला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जिम आणि फिटनेस व्यवसयाशी संबंधित व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
याबाबत अससोसिएशनचे अध्यक्ष नीलेश काळे, उपाध्यक्ष रुपेश चव्हाण, सचिव कौस्तुभ शेडगे, सभासद मनीष पटवर्धन, संजीवनी चिवटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाडे माफी, वीज बिल माफी, व्यवसायासाठी अनुदान, सहज कर्ज योजना, नंतरच्या काळात फिटनेस व्यवसायसाठी चालना मिळावी, म्हणून सरकारने जाहिरातबाजी स्वखर्चाने करावी अशी मागणी केली आहे. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी न दिल्यास साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.