जाणिवांची अंतरे

जाणीव, जाण, संवेदना, सहवेदना हे जवळपास समान अर्थ असणारे शब्द. खरं तर सारख्या जाणिवा जोपासणारे. पण या काळ-काम-वेगाची गणिते सोडवतानाच आपली इतकी दमछाक होते की, या जाणिवांची फुलपाखरं कधी जन्मतात आणि कधी लोप पावतात, तेच कळत नाही. मी कॉलेजमध्ये असताना रोज बसने कॉलेजला जायचे. रोज आम्हा 5/6 मैत्रिणींचा घोळका कॉलेजच्या स्टॉपवर उतरत असू. त्या स्टॉपवर एक आजी रोज दिसायच्या. त्यांची बसण्याची जागाही ठरलेली होती. आम्ही बसमधून उतरलो की, नेमक्‍या त्या माझ्याजवळ यायच्या आणि माझ्यासमोर हात पसरून उभ्या राहायच्या. मीही विचार न करता हातातली चिल्लर नाणी त्यांच्या हातावर टेकवून रिकामी व्हायचे. एक दिवस अशाच त्या माझ्याकडे आल्या पण त्या दिवशी माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. मी त्यांना तसे सांगितल्यावर क्षणभर त्या बावरल्या. न जाणे किती भावनांच्या छटा त्या क्षणभरात त्यांच्या डोळ्यांत तरळून गेल्या. मग त्या सावकाश वळल्या आणि गर्दीत दिसेनाशा झाल्या. तो दिवस आणि आजचा दिवस… कुठेतरी त्यांना पैसे देऊ शकलो नाही ही जाणीव मनात सलत राहिली. जेव्हा जेव्हा मी मनाचे कप्पे उघडते तेव्हा तेव्हा अशा अनेक घटनांच्या लडी उलगडत जातात. जाणिवांची शुभ्र पांढरी पिसे तरंगू लागतात.

एखाद्या गोष्टीची जाणीव असणं ही खरच खूप महत्त्वाची बाब आहे.आपल्याला असलेली जाणीवच मग समोरच्या व्यक्‍तीशी संवाद साधायला मदत करते. संवेदनशील माणसांच्या जाणिवा इतर सर्वसामान्यांच्या मानाने तीव्र असतात. मग असे जाणिवा जागृत असणारे लोकच वेगळ्या वाटा चोखाळतात. आपल्या महाराष्ट्रभूमीत असे अनेक संवेदनशील जाणिवा प्रगल्भ असणारे लोक होऊन गेले. अगदी ज्ञानेश्‍वर माऊलींपासून विकास आमटेंपर्यंत आणि जिजाईपासून सिंधूमाईंपर्यंत कितीतरी परिकथांसारखी उदाहरणे आपल्यासमोर जिवंत होऊन उभी आहेत. हे जाणिवा समृद्ध असण्याचेच द्योतक आहे. जाणीव असणे ही तुम्ही सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक बाजूने किती प्रगल्भ आहात हे दाखवून देते. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्याच व्यक्‍तींमधील एखादी व्यक्‍ती असा त्याच्यातील जाणिवांचा स्पार्क दाखवून देते तेव्हा आपण अचंभित होतो. मी टीव्हीवरील न्यूज न चुकता बघते. त्यात असे वेगळ्या वाटा चोखाळणारे, नव्या जाणिवा जोपासणारे, नवी क्षितीजे शोधणारे लोक मला भेटतात.

प्रख्यात ब्लेडरनर असलेल्या ऑस्कर पिस्टोरियस याचे “ब्लेडरनर’ हे आत्मचरित्र मध्यंतरी माझ्या वाचनात आले. आपल्या आत्मचरित्रात एके ठिकाणी तो म्हणतो, “जेव्हा आपण आपल्या व्यंगावर स्वतः हसायला शिकतो तेव्हाच आपण आतून सशक्‍त होत जातो. म्हणून स्वतःच्या व्यंगावर हसता आले पाहिजे.’ केवढा खोल विचार आणि स्वतःबद्दलची योग्य जाणीव त्याने मांडलीय. तो असो की अरुणिमा सिन्हा. या प्रत्येकाने वेगळ्या जाणिवा जोपासून स्वतःची व्यक्‍तिमत्त्वे लार्जर दॅन लाइफ बनवली आहेत.
पण… या सर्वांमध्ये आपल्या जाणिवा कुठेच उमलताना, विकसित होताना दिसत नाहीयेत. असे का? आपल्यातलेच काहीजण वेगळं काहितरी करण्याची धडपड करत असताना आपण मात्र आपल्या झापडांनी दाखवलेल्या रस्त्यावर कोलूचे बैल बनून सुखेनैव चालत राहतो. होतेही कधीतरी आपल्याला वास्तवाची जाणीव.

आपल्यातलीही ठिणगी पेटते कधीतरी; पण बहुधा ती मल्टीप्लेक्‍सच्या एसीमध्ये विझून जाते किंवा आपण स्वीकारलेल्या लाइफस्टाइलच्या अंधानुकरणात मिटून जाते. एखादा सैनिक सीमेवर चकमकीत शहीद होतो तेव्हा त्याचे ते समर्पण एकतर आपण नजरेआड करतो किंवा अगदी उत्सवी वातावरणात त्याला निरोप देतो. या खरं तर दोन टोकांच्या जाणिवा आहेत. या दोन्हीतला सुवर्णमध्य काढायच्या भानगडीत आपण सहसा पडतच नाही. काय आहे हे? जे सैनिकांच्या बाबतीत तेच आपले स्वातंत्र्यसेनानी किंवा ज्येष्ठांच्या बाबतीत. समाजात घडणाऱ्या दुर्घटना, वाईट गोष्टी यांची झळ आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला बसू नये यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो.पण तीच घटना किंवा एखादी दुर्दैवी गोष्ट शेजारच्या कुटुंबात घडली, तर बऱ्याचदा आपले नुकसान नाही झाले ना? मग आपल्याला काय करायचेय, असा विचार आपण करतो. आपल्या संवेदना, जाणिवा मरत चालल्यात का? आजकाल खून, मानसिक-शारीरिक लैंगिक शोषण असे गैरकृत्य बंद व्हावेत. त्यांना काही प्रमाणात आळा बसावा यासाठी आपण आपले काही योगदान देऊ शकतो का किंवा आपण काही करू शकतो का? याचा विचार न करता आपण अलिप्त भूमिका घेतो.

आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर चर्चा करणारे आपण उरलेले अन्न टाकून देण्यात आघाडीवर आहोत. त्या उन्हातान्हात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टांची जाणीव ते अन्न टाकून देताना आपल्याला का होत नाही? आपण मोठमोठी संकुले, उंच उंच इमारतींमध्ये राहतो पण त्या इमारती बांधणाऱ्या मजुरांच्या मोडक्‍यातोडक्‍या झोपड्या मात्र अंधारलेल्याच राहतात. आज शहरातल्या खोट्या झगमगीच्या आकर्षणापायी हजारो लोक शहरांकडे स्थलांतरित होतात. यात आंतरराष्ट्रीय घुसखोरी होतानाही आपण पाहतो. हे विश्‍व एक ग्लोबल खेडे आहे ही कन्सेप्ट आकाराला येत असतानाच दुसरीकडे हजारो बांगलादेशीय नागरिक त्यांच्या देशातील मूलभूत सुविधांच्या अभावाने आपल्या देशात घुसखोरी करतात. आपल्या ग्रामीण भागातले तरूण, “काय ठेवलंय गावाकडं?’ असा सवाल करत शहरात वसण्याचं स्वप्न बघतात. आपल्या आधीच्या लोकांनी आपल्या संस्कृतीचा मूळ स्वभाव किंवा पाया ओळखून खेडी स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला होता. आज मात्र त्याच्या विपरीत घडतेय. ह्या आणि अशा अनेक गोष्टींच्या वैचारिक घुसळणीत पिचत चाललेले आपण सर्वसामान्य लोक नकळत आपल्या जाणिवा, आपल्या संवेदना नष्ट करत चाललोय.

खरं तर जाणीव ही खूप अलवार गोष्ट आहे. जाणिवेमुळे इतर प्राण्यांपेक्षा माणूस वेगळा झाला आहे. पण दुर्दैवाने आज माणसाने स्वतःच ही जाणिवांची कवाडे बंद करायला सुरुवात केलीय. भूतदया, माणुसकी, सामाजिक बांधिलकी या गोष्टी आउटडेटेड व्हायला लागल्यात. माणसाने, फक्‍त स्वतःपुरत्या वर्तुळात स्वतःला बंद करून घेतलेय. स्वतःचे माणूसपण ही त्याला नकोसे वाटतेय. चंद्रावर, मंगळावर जायची भाषा करताना आपली पायाखालची जमीन सुटत चाललीय याचेही भान तो विसरलाय. अति सुखासीनता आणि स्वकेंद्रितता यात अडकलेल्या माणसाने जर स्वतःच्या जाणिवा जिवंत ठेवल्या नाहीत, तर एकवेळ आपली पुढची पिढीच आपल्याला संवेदनाहीन म्हणून वागवेल. म्हणून देर आये दुरूस्त आये, असे म्हणत पुन्हा जागवूया आपल्या जाणिवा आणि जगूया थोडसं दुसऱ्यासाठीही कधीतरी. हे जाणिवांचे जग खरंच सुंदर आहे आणि जाणिवांची अंतरे ही!

ऊन-सावली
मानसी चिटणीस

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.