पंढरपूर – विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर समोर आली आहे. भाविकांसाठी गुढीपाडव्यापासून पायावरील दर्शन सुरु करण्यात येणार आहे. करोना महामारीमुळे पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तांसाठी पायावरील दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान विठ्ठल भक्तांना आता पायावरील दर्शन घेता येणार आहे. येत्या गुढीपाडव्यापासून ही दर्शन व्यवस्था सुरु होणार आहे.
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना मंदिर समिती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सरकार पदस्पर्श दर्शनाबाबत सकारात्मक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील असे संकेत मिळाले होते.
यानंतर मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज (30 मार्च) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयानंतर 1 एप्रिलपासून देवाच्या पायावरील दर्शन सुरु होणार असल्याचं सांगितले आहे. या निर्णयानंतर विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले आहे.
याशिवाय, मंदिर बंद झाल्यापासून करोनाच्यापार्श्वभूमीवर तुळशीहार, फुले, प्रसाद या मुभा होती. त्यामुळे करोना काळात म्हणजेच गेल्या दोन वर्षापासून मंदिर परिसरात असलेल्या शेकडो लहान व्यापाऱ्यांना उपासमारीची वेळ आली होती. मात्र आता या निर्णयामुळे भाविकांना देवाला अर्पण करण्यासाठी हार, फुले, प्रसाद आत घेऊन जात येणार आहे. त्यामुळे हा लहान व्यापाऱ्यांची उपासमार बंद होणार आहे. या व्यापाऱ्यांमध्ये उत्हासाचे वातावरण आहे.