सदस्यांचा संतप्त सवाल : दुसऱ्या कारकुनाची होणार नियुक्ती
पुणे – जिल्हा परिषदेच्या उत्तर आणि दक्षिण बांधकाम विभागातील निविदा प्रक्रिया ठप्प होऊन कार्यारंभ आदेशाची कार्यवाही होत नसल्यामुळे दोन्ही टेंडर कारकूनच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी बांधकाम समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. त्यावेळी मागणी मान्य करत, दुसऱ्या कारकुनाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद अधिकारी चालवतात की ठेकेदार? असाही सवाल संतप्त सदस्यांनी बैठकीत केला.
गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये जिल्हा परिषदेत 3 हजारांपेक्षा जास्त कामे मंजूर झाली. या कामांची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने तसेच प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर देखील कार्यारंभ आदेश न निघाल्याने सदस्य संतप्त झाले. बांधकाम समिती सभापती प्रवीण माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 2 हजार 800 कामांपैकी सुमारे पाचशे ते साडेपाचशे कामांचा कार्यारंभ आदेश निघाला असल्याची माहिती समोर आली.
मर्जीतील ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. हे आदेश देताना यादीमध्ये फेरफार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच प्रशासकीय मान्यता होऊन देखील तीन ते साडेतीन महिने कार्यारंभ आदेश दिले नसल्याची बाबही समोर आली. त्यामुळे बांधकाम समितीचे सर्व सदस्य आक्रमक झाले. त्यांनी कार्यकारी अभियंता खाडे यांना विचारणा केली, तेव्हा बांधकाम विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे.
एका टेंडर कारकूनकडे जास्तीत जास्त 500 कामांचा कार्यभार क्षमता असताना प्रत्यक्षात 2,800 ची कामे त्यांना करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता यांच्यासह उप अभियंत्यांकडे ही कामाची संख्या 2 ते 3 पटीने जास्त आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यवाही होण्यास वेळ लागतो असे सांगितले.