उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांच्याविरोधात भाजपमध्ये असंतोष

नवी दिल्ली-उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याविरोधात सत्तारूढ भाजपमध्ये असंतोष वाढीस लागल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातून भाजपने पक्षांतर्गत धुसफूस थोपवण्यासाठी त्या राज्यात दोन केंद्रीय निरीक्षक पाठवले.

उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे वृत्त पुढे आले आहे. मुख्यमंत्री रावत यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील काही नेते नाराज असल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याच्या पर्यायावर भाजप विचार करत आहे, असा दावा संबंधित वृत्तामधून करण्यात आला आहे.

भाजपने अद्याप उत्तराखंडमधील पक्षांतर्गत घडामोडींबाबत कुठला सुगावा लागू दिलेला नाही. मात्र, छत्तिसगढचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि ज्येष्ठ नेते दुष्यंतकुमार गौतम यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून उत्तराखंडमध्ये दाखल होणे बरेच काही सांगून जात आहे. केंद्रीय निरीक्षक पक्षाच्या उत्तराखंडमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. नाराज नेत्यांची मनधरणी करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली असण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.