चौथ्या दिवशी 2 हजारांवर हातोडा व्यापारी, पालिका व पोलीस बैठक
मोहीम सुरूच राहणार
कराड -येथील नगर पालिकेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने शहरात चालवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या सलग चौथ्या दिवशीही जोरदार धडाका सुरू ठेवला. शनिवारी दुपारी तीन वाजल्यानंतर पालिका व पोलीस प्रशासनाकडून आझाद चौकापासून ते शाळा क्रमांक 3 व तेथून प्रीतिसंगम बाग आदी ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा टाकला. शहरात प्रशासनाकडून कारवाईचा चौकार मारल्यानंतर त्याच्या निषेधार्थ अखेर व्यापारी व दुकानदार रस्त्यावर उतरले.
त्यांनी पोलीस व पालिका प्रशासनाची बैठक घेऊन मोहिमेविरोधात मवाळ भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. मात्र, त्यांची ही बैठक अखेर निष्फळ ठरली.
पोलीस प्रशासनाच्यावतीने सुमारे 100 होऊन अधिक पोलीस कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांनी चावडी चौकातून आझाद चौक ते दत्त चौक मार्गावरील अतिक्रमणांवर हातोडा टाकला. या संपूर्ण कारवाईत मोठ्या प्रमाणात पक्क्या इमारतींचे दुकानातील फ्लेक्स बोर्ड जेसीबी साह्याने काढून टाकण्यात आले. त्यामध्ये स्वीटमार्ट कापड विक्रीच्या दुकान गाळ्यांबाहेर केलेले अतिक्रमण, टेलिफोन पोल, रस्त्यात आलेल्या दुकानांच्या पायऱ्या, कठडे, चहाच्या टपऱ्या आदी हटविण्यात आले. शनिवारी शहरातील महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नगरपालिका व मंडई परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. कारवाईचा धसका घेत अखेर व्यापाऱ्यांचा स्वतःचा अतिक्रमणे काढून घेत सहकार्य केले.
200 हून अधिक पालिका कर्मचारी
अतिक्रमण हटविण्यासाठी शुक्रवारी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. त्यामध्ये पालिका प्रशासनाने प्रत्येक पथकाला दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर देण्यात आले होते. तसेच दोन्ही पथकात पालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी असे मिळून एकूण दोनशे जणांचा समावेश होता.