पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून विद्यापीठ संकुलात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे विद्यापीठात राहणाऱ्या सर्वांनी उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मंगळवारी प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ आवारातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, विद्यार्थी-विद्यार्थिंनी, रहिवासी अधिकारी-कर्मचारी, अभ्यासत निवास, उपहारगृहे आणि भोजनालय यांना पाणी वापरासंदर्भात विद्यापीठाने सूचना केल्या आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वितरण व्यवस्था आणि तांत्रिक बाबींमुळे विद्यापीठात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीटंचाई सदृश्य समस्या निर्माण होऊ शकते, असे विद्यापीठ प्रशासनचे म्हणणे आहे.
दरम्यान, विद्यापीठाकडून उपलब्ध पर्यायाचा वापर करून योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महापालिका पुरवठा विभागाकडून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले.