चौघांवर गुन्हा दाखल : पुण्यातील गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वर्ग
लोणी काळभोर- एका सुनेचा सासऱ्याने दोनवेळा विनयभंग करून व सासरच्यांनी शारिरीक व मानसिक छळ करून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, सासरे व नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेने हा गुन्हा पुणे शहरातील एका पोलीस ठाण्यात दाखल केला होता. हा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. फिर्यादी महिलेचे पुणे शहरात माहेर आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये घरच्यांच्या विरोधात जाऊन फिर्यादी महिला व तिच्या पतीने देवाची आळंदी येथे विवाह केला होता. आठ दिवस घराबाहेर राहिल्यानंतर दोघेही पतीच्या मूळ घरी राहण्यास गेले होते.
या वेळी करण्यात आलेल्या सत्यनारायणाच्या पुजेच्यावेळी तिच्या वडिलांनी चार तोळ्याचे दागिने तिला दिले होते. हे दागिनेही सासरकडच्या लोकांनी मोडून टाकले होते. तिच्याकडे पैशाची मागणी करून तिचा छळ करण्यात येत होता. घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत तिच्या सासऱ्याने तीन दिवसांत दोनवेळा तिचा विनयभंग केला होता. तिचा पगार घरात द्यावा म्हणून सासू व नणंद तिला मारहाण करीत होते. याबाबत पतीला सांगितले तर तिला जीवे मारण्याची धमकी देत होता.
यासंदर्भात तिने माहेरच्या लोकांच्या मदतीने पुणे शहरातील महिला सहायक कक्षात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार दोन्ही बाजूंची बैठक घेऊन एकत्र रहाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. परत नवीन गाडी घेण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी 25 हजार रुपये दिले होते. लग्न होऊन चार वर्षे झाली तरी तुला मुलबाळ होत नाही, या कारणावरून तिचा छळ करण्यास सुरूवात झाली होती.
तिला सोडून देण्याची धमकी देण्यात येत होती. दरम्यान फिर्यादी महिलेला एका महिलेकडून माहिती मिळाली की तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत. फिर्यादी महिला माहिती देणाऱ्या महिलेच्या घरी असताना तिच्या पतीला बोलावले असता तो तेथे आला. लपलेली फिर्यादी महिला बाहेर येताच त्याने तिला शिवीगाळ करत तो बाहेर निघून गेला. माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला तर तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी त्याने यावेळी दिली. लोणी काळभोर पोलिसांनी पती, सासू, सासरे व नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.