स्मिता हुलवान; जिल्हाधिकाऱ्यांसह महिला आयोगाकडे तक्रार
कराड (प्रतिनिधी) – कराड नगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसेवक विनायक पावसकर यांनी महिला सदस्यांना उद्देशून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेरेबाजी केली. यापूर्वीच्या सभांमध्येही महिलांना उद्देशून शेरेबाजी करणे, द्विअर्थाने बोलणे असे प्रकार घडलेले आहेत. वारंवार महिला सदस्यांना अपमानित करणे, त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणे, सर्व महिलांना लज्जास्पद वाटेल, अशी भाषा वापरणे, याबद्दल पावसकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी जिल्हाधिकारी, महिला आयोग, पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
यावेळी गटनेते राजेंद्रसिंह यादव, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक हणमंत पवार, अतुल शिंदे, अर्चना ढेकळे, सुप्रिया खराडे आदी नगरसेवक उपस्थित होते.
स्मिता हुलवान म्हणाल्या, “”महाराष्ट्रात महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सर्वसामान्य कुटुंबातील अनेक महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत आहेत. कराड नगरपालिकेतील महिला सदस्या प्रभावीपणे काम करत असल्याचे काही प्रस्थापित नगरसेवकांना रुचत नाही. 13 मार्चला झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत भाजपप्रणित आघाडीचे नगरसेवक विनायक पावसकर यांनी माझ्यासह सर्व महिला सदस्यांना उद्देशून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेरेबाजी केली. यापूर्वीही सभागृहात महिला सदस्यांना उद्देशून शेरेबाजी करणे, द्विअर्थाने बोलणे असे प्रकार घडलेले आहेत. नुकत्याच झालेल्या विशेष सभेत कराडचे मुख्याधिकारी एका महिला सदस्याच्या सल्ल्याने चालतात, असा उल्लेख पावसकर यांनी केला.
वृत्तपत्रे व नगरपरिषदेतील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये हे वक्तव्य रेकॉर्ड झाले आहे. याशिवाय पालिकेतील घडामोडींमध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदा, बैठका यामध्येही पावसकर यांनी अशा पद्धतीची शेरेबाजी केलेली आहे. पालिकेतील सर्व महिला सदस्या व त्यांच्या कुटुंबीयांना वारंवार होणाऱ्या या शेरेबाजीने मानसिक त्रास सोसावा लागत आहे. याशिवाय विविध ठिकाणी लज्जास्पद वातावरणाला सामोरे जावे लागत आहे.
” दि. 5 डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत महिला नगराध्यक्षा यांनाही अर्वाच्च भाषा वापरून फिरस्ती असे संबोधले आहे, अशी माहिती देऊन हुलवान म्हणाल्या, “वर्तमानपत्रामध्ये आलेल्या महिला बालकल्याण विभागाच्या जाहिरातीच्या अनुषंगाने मला एकेरी भाषेत आवाज वाढवून दमदाटीची भाषा केली. अशा प्रवृत्तीस वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. अन्यथा महिला राजकीय क्षेत्रामध्ये सक्षमपणे काम करु शकणार नाहीत.” राजकारणामध्ये महिला येणेच टाळतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.