पुणे – पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूकीत टिळक रस्ता आणि अलका चौकात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. टिळक रस्त्यावर पहाटे डीजे वाजवू न दिल्याने मंडळांनी ठिय्या आंदोलन करत श्रींची मुर्ती रस्त्यावर ठेवण्याचा पवित्रा घेतला.
तर अलका चौकात ठराविक ठिकाणी उभे राहून डीजे वाजविण्याचा आग्रह धरल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज करावा लागला. यामुळे परिस्थिती जरा तणावपूर्वक होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान २७ तास उलटूनही विसर्जन मिरवणूक अद्याप सुरु होती. लक्ष्मी रोड, केळकर रोड आणि टिळक रस्त्यावर मंडळांच्या रांगा लागल्या आहेत. आता पर्यंत १७१ गणेश मंडळांचे विसर्जन झाले आहे.
पुण्यात विसर्जन मिरवणूकीत दुसऱ्या दिवशी मंडळांनी पोलिसांच्या संयमाची परिक्षा पाहिली. मंडळे पुढे सरकत नसल्याने अलका चौकात पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. मंडळाचे कार्यकर्ते ठरलेल्या ठिकाणी डीजे वाजविण्याचा आग्रह धरत होते. इतर मंडळे खोळंबल्याने आणि वाहतूकीची कोंडी होत असल्याने पोलिसांनी संबधित मंडळांना समजावण्याचा प्रयत्न केला.
मात्र कार्यकर्ते ऐकत नसल्याने अखेर काठीचा चोप देत मंडळांना अलका चौकातून पुढे ढकलण्यात आले. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिरवणूक चार वाजता संपणार ?
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विसर्जन मिरवणूक आणखी काही तास चालण्याची शक्यता आहे. टिळक रस्त्यावरील मंडळांनी सकाळी डीजे वाजवू न दिल्याने ठिय्या आंदोलन केले होते. त्यांची समजूत घालण्यात बराच वेळ खर्ची झाला. या तणावानंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बॅरिकेटस हटवण्यात आले. मिरवणूक संपण्यास तीन किंवा चार वाजण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.