तिरुपती – आंध्र प्रदेशातील तिरूपती विमानतळाच्या अधिकाऱ्यांशी वाद झाल्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी एका आमदारपुत्राने त्या विमानतळाचे पाणीच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
तिरूपतीच्या रेनिगुंटा विमानतळाचे व्यवस्थापक सुनील आणि तिरूपतीचे उपमहापौर अभिनय रेड्डी यांच्यात झालेल्या वादानंतर हे सगळे नाट्य घडून आले. अभिनय रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आमदार करुणाकर रेड्डी यांचे पुत्र आहेत. रेड्डी हे सत्ताधारी आघाडीतील युवाजन श्रमिक रयथू कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत.
काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मंत्री बोत्सा सत्यनारायण तिरुपती दौऱ्यावर आले होते. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेच्या सांगता समारंभासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्यासोबत तिरुपती देवस्थानचे संचालक वाय व्ही सुब्बा रेड्डी देखील होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी अभिनय रेड्डी विमानतळावर गेले होते. मात्र, व्यवस्थापकांनी अभिनय रेड्डी यांना विमानतळामध्ये प्रवेश नाकारला.
अभिनय रेड्डी आणि विमानतळ व्यवस्थापक सुनील यांच्यामध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेला. मात्र, तरीदेखील सुनील यांनी अभिनय रेड्डी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला नाही. अखेर अभिनय तिथून माघारी फिरले.
त्यानंतर या संपूर्ण विमानतळाचा आणि विमानतळ कर्मचारी राहात असलेल्या नजीकच्या क्वार्टर्सचा पाणीपुरवठा अचानक खंडित झाला. अभिनय रेड्डी हे तिरुपती पालिकेचे उपमहापौर असून त्यांनीच घडलेल्या प्रकाराचा वचपा काढण्यासाठी पाणीपुरवठा खंडित केल्याचे सांगितले गेले.
दरम्यान, तिरुपती पालिकेने मात्र हे दावे फेटाळून लावत पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याचा दावा केला. दरम्यान, यासंदर्भात विमानतळ प्रशासन किंवा पालिका प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला, तरी विरोधी पक्ष असलेल्या तेलुगु देसम पक्षाचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी ट्विटरवरून अभिनय रेड्डी यांच्यावर टीका केली आहे.