शिक्षक संघाच्या अधिवेशन हिशेबावरून वादंग

नगर  – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सासवड येथे 2 मार्च 2019 रोजी झालेल्या शिक्षण परिषदेसाठी जिल्हाभरातील शिक्षकांकडून गोळा केलेल्या रकमेचा भरणा पाच दिवसाच्या आत राज्य संघाच्या खात्यावर करावा अन्यथा शिक्षक संघाच्या घटनेप्रमाणे आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस शिक्षक संघाच्या राज्य शाखेचे सचिव आप्पासाहेब कुल यांनी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय मोहनराव शेळके यांना बजावली असून या नोटिशीमुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.

राज्य संघातर्फे सासवड येथे दोन व तीन मार्च रोजी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी राज्य सरकारने शिक्षकांना ऑन ड्युटी मंजूर केली होती. जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी या परिषदेच्या पावत्या फाडल्या होत्या. पाचशे रुपये प्रत्येकी पावती असलेल्या या रकमेतून तीनशे रुपये राज्य संघाला भरावयाचे होते.

संजय शेळके जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांना पावत्यांचे वितरण केले तसेच फाडलेल्या पावत्या व जमा झालेली रक्कम स्वतःकडे जमा करून घेतली. मात्र राज्य संघाला त्याचा अद्याप पर्यंत भरणा न केल्यामुळे राज्य संघाने ही नोटीस त्यांना दिली आहे. या नोटिशीमुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा राज्य संघाकडे जिल्हाध्यक्षांनी भरणा न केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील शिक्षकांनी सदर शिक्षण परिषदेची ऑनड्युटी घेतली होती. त्याची उपस्थिती पत्रे ही प्रत्येक तालुक्‍याला देण्यात आली आहेत.

मात्र जिल्ह्यातील एकूण किती रक्कम गोळा झाली, किती तालुक्‍यात किती पावत्या फाडल्या गेल्या, त्यापैकी किती रकमेचा भरणा जिल्ह्याकडे झाला याचा कोणताही हिशोब जिल्हाध्यक्षांनी अद्याप पर्यंत दिलेला नाही. जिल्ह्यातील शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष, शिक्षक बॅंकेचे संचालक, विकास मंडळाचे विश्वस्त व जिल्ह्यात काम करणारे राज्याचे व जिल्ह्याचे पदाधिकारी हे सर्व या बाबतीत अनभिज्ञ असून जिल्ह्यातून तालुकानिहाय किती पावत्या फाडल्या गेल्या, त्यापैकी किती रकमेचा भरणा झाला याबाबत कोणतीही मीटिंग जिल्हाध्यक्षांनी आज पावेतो घेतलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कुणालाच नेमकी किती रक्कम जमा झाली याचा हिशोब सांगता येत नाही. याबाबत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्य संघाकडे विचारणा केली असता त्यांनाही याबाबत काहीही माहिती नाही.

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याच्या पावत्या यासुद्धा अहमदनगर मधून श्री संजय शेळके यांनीच वितरित केले असून कोणत्या जिल्ह्याला किती पावत्या दिल्या याचा हिशोब राज्य संघाला आज पर्यंत देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य संघाचे सरचिटणीस आप्पासाहेब कुल यांनी श्री शेळके यांना सदरची नोटीस बजावली असून या नोटिसीला ते काय उत्तर देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाचा कुठलाच हिशेब न दिल्याने राज्य संघ कारवाई करील याची जाणीव शेळकेंना असावी . म्हणूनच त्यांनी संघटना बदलाची तयारी चालवली आहे, असा आरोप त्यांच्या विरोधी गटाने केला आहे.

संजय शेळके यांचा राजीनामा

राज्य शिक्षक संघाच्या नगर जिल्हा शाखेत जे राजकारण सुरु आहे व त्यावरून संभाजी थोरात यांच्या संघटनेतच दोन गट पडले आहेत. या चुकीच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अधिवेशानाच्या पावत्यांच्या हिशोबाबत बोलताना संजय शेळके म्हणाले, माझ्या पाच वर्षाच्या काळात ऐरोली व सासवड येथे दोन अधिवेशने झाली. ऐरोलीचा एक रूपयाही माझ्याकडे आलेला नाही. तर सासवड अधिवेशनाचे एक लाख राज्य शिक्षक संघाकडे, दोन लाख संभाजी थोरात यांच्याकडे दिले आहेत. खर्च 1 लाख 65 हजार इतका झालेला आहे. तसेच चौदा पैकी सात तालुक्‍याचा एक रूपयाही जमा झालेला नाही. तसेच शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले यांनी अडीच लाखांचा चेक संभाजी तात्या यांच्याकडे दिलेला आहे. या उपरोक्‍त हिशोबाबत कुठेही कधीही जिथे बोलवाल तिथे माझी उपस्थित राहून चर्चा करण्याची तयारी आहे, असे शेळके म्हणाले.

शिक्षकांकडून गोळा केलेल्या रकमेचा भरणा करण्याच्या सूचना विभागीय अध्यक्ष या नात्याने संबंधितांना वारंवार केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.शिक्षकांच्या पावत्यांचा हिशोब न देणे हे निंदनीय आहे. नगरसारख्या शिक्षक हित जपणाऱ्या जिल्ह्यासाठी ही लाजीरवाणी बाब आहे.संघटनेच्या दृष्टीने हे हितावह नसल्याने नोटीस काढण्यात आली आहे. एखाद्या नेत्याने जिल्हाध्यक्षाला पावत्यांचा हिशोब देण्यापासून रोखणे आश्‍चर्यकारक आहे.

आबा जगताप , विभागीय अध्यक्ष, शिक्षक संघ

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here