राज्य मंडळ व विद्या प्राधिकरण यांच्यातील वाद-विवाद उफाळले

दहावीच्या निकालाचा अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा रखडला

पुणे : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता दहावीचा निकाल लावण्यासाठी अंतर्गत मुल्यमापनाचा आराखडा राज्य मंडळ की विद्या प्राधिकरण यापैकी कोणी तयार करायचा यावरुन वाद-विवाद उफाळून येऊ लागले आहेत. या वादात आराखडा रखडला आहे.

महाराष्ट्र मंडळाच्या दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. मात्र करोनाचा संसर्ग वाढत असल्याने 15 दिवसांपूर्वीच दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला होता. दहावीच्या परीक्षासाठी 16 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

सीबीएसई बोर्डाने व सीआयएससीई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ राज्य मंडळानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. अंतर्गत मुल्यमापनाद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात येणार आहे. याबाबत राज्य मंडळ व इतर तज्ञ एकत्र येऊन चर्चा करुन निकालाबाबत निकष ठरविणार असल्याचा निर्णय ही शासनाकडून जाहीर करण्यात आला.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी, राज्य मंडळ, सल्लागार समिती यांची पहिली बैठक घेतली. त्यानंतर नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठकाचे सत्र आजूनही सुरुच आहे. राज्य मंडळाचे काम हे परीक्षा घेण्याचे आहे. निकालाबाबत अंतर्गत मुल्यमापनाचा आराखडा तयार करण्याचे व ते जाहीर करण्याचे काम व अधिकार हे नियमांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (विद्या प्राधिकरण) आहे. मात्र अद्याप पर्यंत निकष काय ठरवायचे यावर अधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब उघड झालेली आहे. दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे काम आम्हचे नाही असे म्हणत अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करण्याचा धडाका लावला आहे.

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या निकालाबाबत अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा तयार करुन तो जाहीरही केलेला आहे. त्यामुळे शाळांनी निकालाचे कामकाज सुरु केलेले आहे. महाराष्ट्र मंडळाचे मात्र अद्याप दहावीची परीक्षा रद्द केल्याचेही लेखी आदेश शासनाने काढलेले नाहीत हे अजबच म्हणावे लागणार आहे. निकालाबाबत अंतर्गत मुल्यमापन आराखडा तयार होत नसल्याने विद्यार्थी, पालकांचे टेन्शन मात्र वाढू लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.