वाई पालिकेची सभा विरोधकांकडून तहकूब

वाई  – नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक अंदाजपत्रकाच्या मंजुरीसाठी बोलविलेल्या सर्वसाधारण सभेत विरोधक तीर्थक्षेत्र आघाडीने प्रशासनाने मांडलेल्या अंदाज पत्रकात अनेक त्रुटी असल्याचे कारण देत उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी उपसुचनेच्या आधारे सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.

प्रशासनाने लोकनियुक्त पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेता यावर्षीचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले. परंतु, विरोधकांनी त्या अंदाज पत्रकात नाविन्य असे काहीही नसल्याने हे अंदाज पत्रक कॉपीपेस्ट आहे, असा आरोप करीत बहुमताच्या जोरावर फेटाळून लावत सभा तहकूब केली. यावेळी सर्वच उपस्थित सदस्यांनी पालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली. चरण गायकवाड यांनी या अंदाज पत्रकात वाई शहरातील प्रत्येक प्रभागातील सदस्यांना का विश्‍वासात घेवून अंदाज पत्रक मांडण्यात आला नाही. त्यावर श्रीकांत चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरत अनेक दुरुस्त्या सुचविल्या, तर नगरसेवक राजेश गुरव यांनी नगराध्यक्षांनी अंदाज पत्रकावर मंजुरीच्या सह्या केल्या आहेत.

तर इतर सदस्यांना पालिकेत का बोलावण्यात आले आहे असा प्रश्‍न उपस्थित केला. अंदाज पत्रकावर कसलीही चर्चा झालेली नसताना नगराध्यक्षांनी सह्या करण्याचा उद्देश काय? असा प्रश्‍न उपस्थित करीत उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पालिकेचे करोडो रुपयांचे बजेट मांडताना काय तरतुदी करण्यात आल्या आहेत, याचा नगराध्यक्षा डॉ, प्रतिभा शिंदे यांनी खुलासा करावा असा आग्रह धरला.

पालिकेची आर्थिक स्थिती विषयी सदस्यांना अंधारात ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप अनिल सावंत यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला. नगराध्यक्षा सभागृहात एकाकी पडलेल्या दिसल्या. पालिका प्रशासन पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. सभेस नगरसेवक महेंद्र धनवे, प्रदीप चोरगे, दीपक ओसवाल, भारत खामकर, राजेश गुरव, बाळासाहेब बागुल, ऍड. श्रीकांत चव्हाण, संग्राम पवार, सौ. रेश्‍मा जायगुडे, सौ. स्मिता हगीर, सौ. प्रियांका डोंगरे, सौ. शितल शिंदे, सौ. वासंती ढेकाणे, सौ. रुपाली वनारसे, सौ. सुनिता चक्के आदी उपस्थित होते.

वाई नगरपरिषद वाईचे 2019-20 चे बजेट सर्व तांत्रिक व प्रशासकीय बाजू बघून दुरुस्ती व मंजुरी साठी सर्वसाधारण सभेकडे सादर करण्यात आले होते. सदस्यांकडून दुरुस्त्या अपेक्षित होत्या. परंतु उपनगराध्यक्ष व त्यांच्या सहकारी सदस्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी बजेटची सभा तहकूब केली.

– सतीश वैराट, विरोधी पक्ष नेता

Leave A Reply

Your email address will not be published.