कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या आजच्या वार्षिक सभेत राडा झाला. मंगळवारी विरोध झुगारून नवीन कार्यकारिणी मंजूरी झाली. या कार्यकारिणी निवडीसाठी मतदान घेण्याच्या पध्दतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ढकलाढकली, एकमेकांच्या विरोधातील घोषणाबाजी झाली. अशा गोंधळाच्या वातावरणात अवघ्या अर्ध्या तासात सभा पार पडली.
कोल्हापूरच्या विद्याभवनमधील सभागृहात सकाळी 11 वाजता मुख्याध्यापक संघाची 76 वी वार्षिक सभा सुरू झाली. अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी प्रास्ताविकात वर्षभरातील कामाचा आढावा सादर केला. सचिव दत्ता पाटील यांनी नवीन कार्यकारिणी निवडीचा विषय मांडताच त्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली नसल्याचे सांगत विरोधकांतील व्ही. जे. पोवार, आर. वाय पाटील, आदींनी या विषयाला विरोध केला.
पण, हात उंचावून मतदान घेण्यावर सत्ताधारी ठाम राहिले. त्यातून वादावादी आणि खडाजंगी झाली. त्यात विरोधकांतील काहींनी व्यासपीठावर जाऊन माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना समर्थकांनी रोखले.
व्यासपीठाखाली दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये हमरी-तुमरी, ढकलाढकली सुरू झाली. विरोधकांनी हुकुमशाही, दडपशाहीचा धिक्कार असो अशा, तर सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा विजय असो अशा घोषणा सुरू केल्या. त्यातच सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी हात उंचावून मत नोंदवित नवीन कार्यकारिणी निवडीचा विषय मंजूर केला.