ठेका सुरू राहणार : आयुक्त; कामगार संघटनेकडून ठेक्यास मिळविली स्थगिती
नगर – नगर शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होत असतांना महापालिका कामगार संघटना मात्र त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. कचरा संकलन व वाहतूकीचा ठेका आकांक्षा एन्टरप्रायजेसला देण्यात आला असतांना त्या ठेक्यास कामगार संघटनांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडून स्थगिती मिळविली आहे.
दरम्यान, शहरातील स्वच्छेला महत्त्व देत कामगार आयुक्तांचा आदेश तपासून पाहण्यात येईल, तोपर्यंत हा ठेका सुरू राहणार असल्याची माहिती आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. महापालिकेने चारही प्रभागातील कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या.
त्यात आकांक्षा एन्टरप्रायजेस या संस्थेची निविदा स्वीकारली. शहरात गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलन होत नसल्याने जागो-जागी कचऱ्याचे ढिग साठले आहेत. त्यामुळे ठेका देवून हे संकलन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतले होते. परंतु आता त्याला कामगार संघटनेकडून खोडा घालण्यात आला आहे.
कचरा संकलनासाठी महापालिकेकडे कर्मचारी असतांना हा ठेका देण्यात येत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पण हे कर्मचारी काम करीत नसल्याने प्रशासनाला ठेका देण्याचा निर्णय द्यावा लागला आहे.
आज संघटनेने सहाय्यक कामगार आयुक्तांकडून या ठेक्यास स्थगिती मिळविली आहे. परंतु आयुक्त भालसिंग यांनी मात्र हा ठेका स्थगित केला जाणार नाही.
कामगार आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची कायदेशिर तपासणी करण्यात येईल. असे असले तरी या ठेक्यास स्थगिती न देता ते काम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.