तब्बल 10 टन दारूगोळा सुरक्षित निकामी : दक्षिण मुख्यालय तुकडीचे कार्य
पुणे – लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांतर्गत कार्यरत सैन्य तुकडीने सिपकोटच्या औद्योगिक क्षेत्रात जमा केलेला जवळपास 10 टन दारुगोळा सुरक्षितरित्या निकामी केला. लष्करातर्फे “ऐड टू सिविलियन’ या तत्त्वांतर्गत राबवलेल्या या मोहिमेला “ऑपरेशन तिरुवल्लूर’ असे संबोधिण्यात आले.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या विशेष परवानगीने ही मोहीम राबविण्यात आली. तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील गुम्मिडिपुंडीमध्ये सिपकोट ही औद्योगिक वसाहत आहे. येथे गेल्या काही वर्षांमध्ये येथील काही कारखान्यांनी अनवधानाने हा दारुगोळा जमा केला असावा, असा अंदाज लष्कराने वर्तविला आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी या दारुगोळ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाने केला होता. मात्र, तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यावेळी झालेल्या हिंसक स्फोटात एका कारखान्यातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्यानंतर अनेक वर्षे हा विषय प्रलंबित होता.
नुकतेच तामिळनाडू राज्य सरकारच्या विनंतीवरून आणि संरक्षण मंत्रालयाच्या विशेष परवानगीने हे “ऑपरेशन तिरुवल्लूर’ यशस्वीपणे राबविण्यात आले. आणखी काही दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.
दारुगोळ्याची विल्हेवाट ही अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
यामध्ये धातूचे भाग वेगळे करणे आणि इतर घटकांची विल्हेवाट लावणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. “ऑपरेशन तिरुवल्लूर’ हे सैन्य दलाचे नागरी सुरक्षितेसाठीच्या प्रयत्नांसाठीचे एक आदर्श उदाहरण असल्याचे मत लष्कर प्रशासनाने व्यक्त केले.