आरोग्य विभागाच्या अनास्थेचा भांडाफोड

मुदतबाह्य औषधी सापडल्या भंगाराच्या वाहनात


जिल्हा परिषदेचे कोट्यवधी रुपये “मातीत’


रक्‍त तपासणी किटचाही समावेश; सर्वच अनभिज्ञ

पुणे – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. तर, दुसरीकडे कोट्यावधी रुपयांच्या आणि मुदत संपलेल्या औषधांचा साठा भंगाराच्या गाडीत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी चव्हाट्यावर आला आहे. या औषधांची “एक्‍स्पायरी डेट’2016 मधील असून या प्रकाराने प्रशासन हादरले आहे.

जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 500 हून अधिक उपकेंद्रे आहे. बहुतांश आरोग्य केंद्रात दररोजची ओपीडी संख्या 100वर आहे. मात्र, डॉक्‍टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे वेळेत उपचार मिळेल याची शाश्‍वती नाही. तर, दरवर्षी कोट्यवधी रूपयांची औषध खरेदी केली जाते. परंतू, आरोग्य केंद्रांमध्ये नेहमीच औषधांचा तुटवडा असल्याची “बोंब’ सुरू असते. यावर सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी औषधांच्या गोडाऊनवर छापा टाकत आरोग्य विभागाच्या अनास्थेची “पोलखोल’ केली. त्यावेळी 2014-15 मध्ये खरेदी केलेली कोट्यवधी रुपयांची औषधे, रक्त तपासणी किट कोरेगाव पार्क येथील मोकळ्या जागेत असलेल्या भंगाराच्या टेम्पोमध्ये कुलूप लावून ठेवल्याचे आढळून आले.

या टेम्पोमध्ये लहान मुलांना तापावर देण्यात येणारे औषध (पॅरासिटामॉल) असून सन 2014 मध्ये आरोग्य विभागाने हजारो बाटल्या खरेदी केल्या होत्या. त्यावेळी हे औषध खराब असल्याने पुन्हा जमा करण्यात आले. त्यामुळे ही औषधे संबधित कंपनीला देऊन बिलाची रक्कम वसूल करणे आवश्‍यक होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हे औषध याचठिकाणी धुळखात पडून आहेत. त्याबाबत आरोग्य विभागाच्या समिती आणि पदाधिकाऱ्यांना माहितीच नसल्याची बाब समोर आली.

आरोग्य विभागाकडून आवश्‍यकतेनुसार औषधांची खरेदी केली जात नाही. ही औषधे चांगल्या ठिकाणी ठेवणे अपेतखत होते. मात्र, भंगाराच्या टेम्पोमध्ये औषधे ठेवण्याचा काय उद्देश? त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून यापुढे असा भ्रष्टाचार करताना अधिकारी धास्तावले पाहिजेत.
– शरद बुट्टेपाटील, भाजप गटनेते, जि. प. पुणे


हा प्रकार धक्कादायक असून, त्यांची सखोल चौकशी होईल. त्यासाठी समिती स्थापन करून ही औषधे खरेदी कधी केली, त्याठिकाणी कशी गेली याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
-उदय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.