लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील नागरिकांना मिळणार संधी
केवळ 419 जणांनी घेतले घर : मुदतवाढीसाठी आज बैठक
पुणे – स्वत:चे घर नसलेल्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका 5 ठिकाणी 3 हजार घरे बांधणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात केवळ 419 जणांनीच घर घेण्यासाठी आवश्यक 10 टक्के रक्कम भरली आहे. त्यामुळे उर्वरित घरांसाठी प्रतीक्षा यादीतील नागरिकांना संधी दिली जाणार आहे.
केवळ 10 ते 12 लाखांत घर आणि 90 टक्के कर्ज उपलब्ध करून देऊनही या प्रकल्पास प्रतिसाद न मिळत नसल्याचे चित्र आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज बोलविली आहे. आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडे तब्बल 1 लाखांहून अधिक अर्ज आले.
त्यात जवळपास 30 हजार जण पात्र ठरले आहेत. त्यातील पहिल्या 2 हजार 918 घरांसाठी 24 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन भागांत 5 ठिकाणी ही घरे असतील. घराची लॉटरी लागल्याची माहिती पात्र ठरलेल्या प्रत्येकाला पालिकेने आतापर्यंत पाच ते सहावेळा कळवली आहे.
दरम्यान, ही लॉटरी काढल्यानंतर पैसे भरण्याच्या आजच्या (दि.23) शेवटच्या दिवशीपर्यंत पैसे भरण्यासाठी जवळपास 1,800 जणांनी चलन नेले होते. तर 419 जणांनीच पैसे भरल्याने त्यांनाच घर मिळणार आहे. नियमानुसार आता प्रतीक्षा यादीतील नागरिकांना पैसे भरण्यासाठी संधी देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.