पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येकाने आपली मातृभाषा शिकलीच पाहिजे. शिवाय राष्ट्रभाषा हिंदी आणि जागतिक भाषा म्हणून इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवले पाहिजे. त्याचा पाया हा शिक्षण आणि वाचनामुळे घातला जात असल्याने सध्याच्या काळातही पुस्तकांचे महत्त्व आहे. शासकीय स्तरावर अनेक शैक्षणिक संस्थांमध्येच भाषा शिक्षणाबाबत अनास्था जाणवते. यात बदल करण्याची गरज आहे, असे मत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या सहकार्याने “पुणे बुक फेअर’मध्ये आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचे उद्घाटन पुलकुंडवार यांच्या हस्ते झाले. या उपक्रमामध्ये लेखक डॉ. संदीप श्रोत्री आणि कवी बंडा जोशी यांनी संवाद साधला.
मी माझ्या दोन्ही मुलांना मराठी शाळेतच शिकवले. मातृभाषेतून शिक्षण घेणे म्हणजे आपल्या अधिक प्रगतीसाठी दारे खुली करणे होय. मातृभाषेतील शिक्षण आपल्या कल्पनांचा पाया भक्कम करते. सर्व भाषेतील पुस्तकांच्या प्रसार आणि वाचनासाठी सर्व ते सहकार्य करू, असे डॉ. पुलकुंडवार म्हणाले.