मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. मात्र तरीही हे प्रकरण अजुन चर्चेत असते. सुशांतनंतर त्याची पूर्वाश्रमीची मॅनेजर दिशा सॅलीयनचाही मृत्यू झाला व त्याबाबत बरेच तर्क लढवले जात होते. किंबहुना दिशाच्या मृत्यूच्या घटनेमुळे सुशांतच्या मृत्यूबाबतचे संशयाचे वातावरण अधिकच गडद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दिशाचा मृत्यू ही एक दुर्घटना असल्याचा अहवाला सीबीआयने दिला असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या हवाल्याने काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, नशेच्या अमलाखाली असताना छतावरून खाली पडून दिशाचा मृत्यू झाला आहे. सीबीआयच्या या अहवालामुळे दिशा आणि सुशांतच्या मृत्यूचा परस्परांशी काही संबंध नसल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. 2020 मध्ये मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडून दिशाचा मृत्यू झाला होता. ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
या प्रकरणात सीबीआयने स्वतंत्र एफआयआर दाखल केली नव्हती तर सुशांतच्या प्रकरणाशी जोडूनच त्याचा तपास केला जात होता. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार 8 जून 2020 रोजी दिशाच्या वाढदिवसानिमित्त एक पार्टी होती. त्यात तिने मद्य प्राशन केले होते. त्यामुळे तिचा तोल गेला आणि खाली पडून तिचा मृत्यू झाला. भारतीय जनता पार्टीचे नेते विशेषत: नारायण राणे आणि त्यांच्या मुलांकडून या प्रकरणाचा संबंध माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी जोडला जात होता.