नवी दिल्ली – पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्याने नाराज असणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्यात पाऊण तास चर्चा झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून नाट्यमय आणि वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्रिपद गमवावे लागल्यानंतर अनेक पर्याय खुले असल्याची प्रतिक्रिया देणाऱ्या अमरिंदर यांनी मंगळवारी दिल्ली गाठली.
त्यानंतर बुधवारी ते शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दोघांची भेट विविध प्रकारच्या राजकीय चर्चांना खतपाणी घालणारी ठरणारी आहे. शहा यांची भेट घेतल्यानंतर अमरिंदर यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबतचे आपले पत्ते खोलले नाहीत. अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या त्या भेटीबाबत अमरिंदर यांच्या वतीने ट्विट करण्यात आले.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत शहा यांच्याशी चर्चा केली. कृषी कायदे मागे घेऊन पेच मिटवण्याची विनंती त्यांना केली, असे त्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले. मात्र, कुठली राजकीय चर्चा झाली का याचा सुगावा अमरिंदर यांनी लागू दिला नाही.