जलपर्णीमुळे पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिकेची नामुष्की

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी व पवना नदी पात्रांमधील जलपर्णीची अनियंत्रित वाढ महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे जलपर्णीमुळे यंदाही नागरिक त्रस्त आणि राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. जलपर्णी हटविण्यासाठी पालिकेकडे निवेदनांची संख्या वाढली आहे. आता मात्र राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करुन पालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

गुुरुवारी दिवसभरात वंचित बहुजन आघाडीने पालिकेच्या सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. तर शिवसेना नगरसेवक यांनी गळ्यात जलपर्णीचा हार घालून पालिकेत ठिय्या मांडला. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने कासारवाडी येथील ह प्रभाग कार्यालयात आणि अधिकाऱ्यांच्या टेबलवर जलपर्णी ठेऊन आंदोलन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शहरातून वाहणाऱ्या नद्यांना जलपर्णीचा जखडले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जलपर्णी काढण्यासाठी ठेके देण्यात आले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे ठेकेदार पावसाची वाट पाहत आहे.

इंद्रायणी आणि पवना या दोन्ही नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना राबविण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याकरिता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

भाविक इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करून या नदीचे तीर्थ प्राशन करतात. मात्र, नदीपात्रात उगवलेल्या जलपर्णीमुळे इंद्रायणी व पवना नदीचा संपूर्ण जलप्रवाह झाकला गेला असून विविध समस्या उद्‌भवल्या आहेत. या जलपर्णीमुळे नदीचे पाणी काळे पडले असूनजलचरांच्या अस्तित्वाला देखील धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर पांढरा फेस दिसत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वंचितच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला आघाडी अध्यक्षा लता रोकडे, राजन नायर, कार्याध्यक्ष संजीवन कांबळे, सुनील गायकवाड, किरण हिंगणे, बाबुराव फुलमाळी, गुलाब पानपाटील, राहुल इनकर, महिला आघाडी महासचिव गौरी शेलार, शारदा बनसोडे, बशीरा शेख, उषा वाघमारे, राहुल बनसोडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

शिवसेना नगरसेवकाचे जलपर्णी घालून आंदोलन
महापालिकेची आज (दि.18) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा ऑनलाईन पद्धतीने होणारा असली, तरी देखील महापौर माई ढोरे व आयुक्‍त राजेश पाटील व अन्य जबाबदार पदाधिकारी व अधिकारी या सभेला उपस्थित राहणार असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी गळ्यात जलपर्णी अडकवून सभागृहासमोर ठिय्या आंदोलन केले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना सभागृहात जाण्यापासून रोखले असता, त्यांची बाचाबाची झाली. मात्र ते आंदोलनावर ठाम राहिले आणि प्रशासनाचा निषेध नोंदविला.

कार्यालयात फेकली जलपर्णी
दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभागामध्ये वाढत्या जलपर्णीच्या निषेधार्थ दापोडी शिवसेना विभागातर्फे, ह प्रभाग कार्यालयामध्ये घूसुन अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, उपशहर प्रमुख तुषार नवले, विभागप्रमुख राजू सोलापुरे – युवानेते गोपाळ मोरे, सुषमा शेलार, कोमल जाधव शाखाप्रमुख सुनिल ओव्हाळ, विनोद जाधव, मंदार तांबे, लोकेश पुजारी, रियाज शेख, रामभाऊ निगूट, प्रमोद गायकवाड राहुल जाधव, शिवाजी कूर्हाडकर, गजानन धावडे, निखील जाधव, शिवाजी खोमणे व शिवसैनिक उपस्थित होते.

ठेकेदार बदलण्याची समाजवादी पक्षाची मागणी
समाजवादी पार्टीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्‍त राजेश पाटील यांची भेट घेतली. जलपर्णी काढण्याचे 2 कोटी 25 लाख रुपयांचे टेंडर देण्यात आले असून या ठेकेदाराने काम केलेले नाही. अद्यापही ही जलपर्णी आहे तशीच आहे यामुळे या ठेकेदारचे काम त्वरित काढून त्याच्याऐवजी दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्‍ती करण्याची मागणी केली. यावेळी शहराध्यक्ष रफीक कुरेशी, विधानसभा अध्यक्ष रवी यादव, महासचिव ब्रिजेश यादव, उपाध्यक्ष राज कुमार यादव, युवक अध्यक्ष साजिद शेख, संघटक राहुल जाधव आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.