नवी दिल्ली – आपल्या खास शैलीत विरोधकांवर टीका करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लीकन पक्षाचे नाव खराब करण्यासाठी अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरले आहे. तसेच त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेत गुंडगिरी करून आपल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव बदनाम केले आहे. दिल्लीत आज घेतलेल्या पत्रकार परिषद रामदास आठवले बोलत होते. याप्रसंगी रिपब्लिकन नेत्या, अभिनेत्री पायल घोषही उपस्थित होत्या. याव्यतिरिक्त आठवले यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यासंदर्भातही आपले मत व्यक्त केले.
यावेळी आठवले यांनी कृषी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. कृषी कायदे रद्द करण्याचा आग्रह शेतकरी संघटनांनी सोडून द्यावा. कृषी कायद्यावर संशोधन करण्यासाठी शेतकरी संघटनांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केलं. तसेच कृषी कायदे चांगले असून ते मागे घेणं योग्य नाही. ही प्रथा पडल्यास पुढे कोणीही उठून कुठल्याही कायद्याला विरोध करेल. त्यामुळे प्रत्येक कायदा मागे घ्यावा लागेल. कायदे परत घेतल्यास संविधानालाच धोका निर्माण होईल, असंही ते म्हणाले.
दरम्यान राज्यातील बलात्कार प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना सरकार पाठिशी घालत असल्याचे आठवले यांनी म्हटले. या प्रकरणी सरकारने सत्य शोधायला हवं, असंही ते म्हणाले.