मंचर, (प्रतिनिधी) – भीमाशंकर, पाटण व आहुपे खोर्यांमध्ये भात पिकांवर करपा, तांबेरा व खोड किडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भात शेती धोक्यात आली आहे. कृषी विभागामार्फत भात पिकाची पाहणी करुन पंचनामे करावेत, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.
पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीचे आगार समजले जाते. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३,८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भात लागवड केली जाते.
प्रत्येक वर्षी आदिवासी शेतकरी हा रोहिणी व मृग नक्षत्रांच्या माध्यमातून शुभमुहूर्त समजून धुळवाफेत पेरण्या करत असतो. दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी ही आदिवासी बांधवांनी रोहिणी व मृग नक्षत्रांमध्ये धूळवाफेत पेरण्या केल्या.
गतवर्षांपेक्षा चालू वर्षी रोहिणी मृग नक्षत्रांपाठोपाठ आद्र व पुनर्वसु (कोर)या नक्षत्रांतही सुरुवातीपासूनच पावसाने चांगलीच साथ दिल्याने भात पेरणी केलेला वरचा दाणा व माती आड झालेला गेलेला दाणा उतरुन येवून भात रोपे चांगल्या प्रकारे तरारु लागल्याने आदिवासी शेतकर्यांनी लागवडी उरकून घेतल्या.
त्या नंतर गेले दहा ते पंधरा दिवसांपासून या भागामध्ये पावसाने लपंडाव सुरू केला आहे. दाट धुके व रोगीट वातावरणामुळे या भात पिकांवर करपा, तांबेरा व खोड किडा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भात पिके जळू लागली आहेत. रोग पडल्यानंतर पुढील लक्षण जाणवत आहेत.
या भागात राहणारा आदिवासी शेतकरी हा बारा महिन्यातून भात एकमेव पीक काढतो. भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा तो मुख्य आधार समजला जातो. गेले कित्येक वर्षांपासून निसर्ग चक्रांच्या अवकृपेमुळे भात शेती संकटात सापडल्याचे चित्र आहे.
बारा महिने मोठ्या आशेने काबाड कष्ट करून ऐन वेळी होणार्या निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भात उत्पादनवाढीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
भात पिकांना करपा, तांबेरा व खोड किड्याने ग्रासल्याने सगळीकडे भात रोपे तांबडी पिवळी पडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले महिनाभरापासून पावसाने या भागामध्ये लपंडाव सुरू केला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे या तिनही खोर्यांमध्ये भात पिकांना करपा, तांबेरा व खोड किड्याने या रोगांनी ग्रासल्याने भात पीक अत्यंत पिवळी व तांबडी पडून जळून गेली आहेत.
प्रशासनाने योग्य ती दखल घेवून कृषी विभागामार्फत या भागातील भात पिकाची पाहणी करुन पंचनामे करावेत, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.
करपा : भातरोपांची पाती ही पिवळी पडून जळू लागतात.
तांबेरा : या रोगामध्ये भातरोपांची पाती ही तांबडी पडून सुकू लागतात.
खोड कीडा : हा कीडा रोपाच्या मुळामध्ये शिरून पूर्ण भातरोप पोखरतो.